संगमनेर पालिकेचा ‘बुलडोझर’ फक्त गरिबांवरच गर्जणार का ? श्रीमंत, धनदांडगे, भांडवलदारांना केवळ ‘कागदी नोटिसांचा’ मलम !
वशिलेबाजी आणि पक्षपाती कारभाराविरुद्ध संगमनेरकरांमध्ये तीव्र संताप
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर नगरपालिकेच्या वतीने शहरात सध्या सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. “श्रीमंत धनदांडग्या भांडवलदारांना फक्त कागदी नोटिसा आणि गोरगरिबांच्या पोटावर थेट बुलडोझर,” असा संतापजनक प्रकार या मोहिमेच्या निमित्ताने समोर येत असून, पालिका प्रशासनाच्या या एकतर्फी आणि पक्षपाती भूमिकेविरोधात संगमनेरच्या सामान्य जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे संसार अडचणीत येतील अशी कृती करणाऱ्या पालिकेची हिम्मत बड्या धेंडांच्या अनधिकृत इमारतींवर हातोडा टाकताना का खचते ? असा थेट सवाल आता नागरिक विचारत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेर प्रशासनाने शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चावडी पर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील छोट्या व्यावसायिकांना टार्गेट करण्यात आले. या रस्त्यावरील दुकानांचे ओटे, पायऱ्या, फलक आणि रस्त्यावरील फलक पालिकेच्या बुलडोझरने क्षणात भुईसपाट केले. हीच परिस्थिती पुणे-नाशिक महामार्गावरही पाहायला मिळाली.
आपल्या व्यवसायाचे छत्र डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून संतप्त नागरिक आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी तीव्र शाब्दिक चकमकी उडाल्या. “आमच्या हातावर पोट आहे, आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना पालिकेने थेट आमच्या रोजीरोटीवरच कुऱ्हाड चालवली आहे,” अशा भावना बाधित व्यक्त करित आहेत.

एकीकडे गरिबांचे ओटे तोडताना दाखवलेले शौर्य मोठ्या भांडवलदारांसमोर मात्र पुरते गळून पडल्याचे चित्र शहरात आहे. शहरामध्ये नियम धाब्यावर बसवून उभ्या राहिलेल्या भव्य इमारती, मंजूर नकाशापेक्षा जास्त केलेले बांधकाम, मंगल कार्यालये, मोठ मोठे कापड दुकाने, पार्किंग न ठेवलेल्या अनेक व्यापारी इमारती, बेकायदेशीर वाढवलेले मजले आणि हॉस्पिटलचे बांधकाम, अनधिकृत गाळे उघड उघड दिसत असताना येथे मात्र कारवाई करण्याची हिंमत केली जात नाही. अनेक इमारतींमध्ये जमिनीखाली (अंडरग्राउंड) गाळे बांधण्यात येऊन नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत तेथे कारवाई केले जात नाही.
“श्रीमंत धनदांडग्यांनी शहराची वाट लावली आहे. त्यांच्या मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची नगरपालिकेची छाती नाही. त्यांना केवळ नोटिसा पाठवून ‘कागदी घोडे’ नाचवले जातात. मात्र, गरिबांच्या टपऱ्यांवर थेट बुलडोझर चालवला जातो. हा कसला न्याय ?” असाही संतप्त सवाल केला जात आहे.

नगरपालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये झालेले अतिक्रमण कधी काढणार ?
एवढेच नव्हे तर संगमनेर शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी नगर परिषदेची व्यापारी संकुले आहेत, त्या सर्व व्यापारी संकुलांच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले जाते. ओटे बांधले गेले आहेत. फुटपाथ बंद केले गेले आहेत. नगरपालिकेच्या इमारतींची दुरवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी होणाऱ्या अतिक्रमणांचा आणि नगरपालिकेच्या इमारतींचा जो गैरफायदा घेण्यात येतो त्यावर नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. नगरपालिकेचे नियम धाब्यावर बसवत नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांची तोडफोड करणे, साईज बदलणे, अतिक्रमण करणे यावर पालिका कधी कारवाई करणार असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नगरपालिका प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. पुढे कुठे कारवाई होणार ? कारवाईचा निकष (Criteria) काय ? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जनतेला दिली जात नाही. अधिकाऱ्यांनी यावर मौन धारण केले आहे.
सूत्रांच्या मते, सत्ताधारी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यांचे पाठीराखे पडद्यामागून या मोहिमेची सूत्रे हलवत असून, स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकीय आकसापोटी ही एकतर्फी कारवाई घडवून आणली असल्याचे बोलले जात आहे. वशिलेबाजीचा थांबवून सर्वांना समान नियम या पद्धतीने जर बड्या मंडळींवर कारवाई झाली नाही, तर संगमनेरमधील जनक्षोभाचा भडका उडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
