संगमनेरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ; धंदे बंद असल्याचे पोलिसांचे केवळ नाटक !
कायदा व सुव्यवस्था मात्र वाऱ्यावर…
संगमनेर प्रतिनिधी –
“वरवर पाहता सर्वकाही शांत आणि कायद्याच्या चौकटीत असल्याचा आव आणला जात असला, तरी ‘दिखावे पे मत जाओ’ अशीच काहीशी परिस्थिती सध्या संगमनेर शहर आणि तालुक्यात पाहायला मिळत आहे.” संगमनेरमध्ये पोलीस प्रशासन अवैध धंदे बंद असल्याचे नाटक करत असले, तरी प्रत्यक्षात मात्र मटका, जुगार, गुटखा तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट झाला आहे. तालुक्यात दररोज लाखो रुपयांची अवैध उलाढाल होत असून, पोलिसांच्या या सुस्त कारभारामुळे जनसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात मटका व्यवसायात संगमनेर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. येथील मटका कधीच बंद होत नाही, उलट त्याला राजाश्रय आणि ‘खाकी’चे संरक्षण मिळत असल्याचा संशय आहे. ‘तीन बत्ती’ परिसरापासून सुरू होणारी ही ‘मटक्याची जहागीरदारी’ संपूर्ण तालुक्यात पसरली आहे. मटक्यासोबतच गांजा, गुटखा, वाळू तस्करी, गौण खनिज तस्करी आणि जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कत्तलखान्यांची रेलचेल वाढली आहे. आणि ही ‘जहागीरदारी’ कायमची मोडून काढण्यासाठी पोलीस विभागातून प्रयत्न होत नाहीत असेही बोलले जात आहे.

कायदा व सुव्यवस्था मात्र वाऱ्यावर…
अवैध धंद्यांच्या पैशांमधून तालुक्यात गुन्हेगारीने भयानक रूप धारण केले आहे. आता थेट रिव्हॉल्व्हर (अग्निशस्त्रे) आणि तलवारींचा सर्रास वापर सुरू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हे करून आरोपी फरार होतात आणि पोलिसांना सापडत नाहीत. पोलिसांच्या या अपयशी कार्यपद्धतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडगाव पान येथील बालिकेवरील ॲसिड हल्ल्यातील आरोपी अद्यापही पसार आहेत. मालुंजे गोळीबार प्रकरणातील आरोपीं बाबतही तसाच प्रकार आहे. अल्पवयीन मुलाला आरोपी ठरवून त्याला तुरुंगात डांबल्याचा आणि त्याचा छळ केल्याचा देखील आरोप पोलिसांवर आहे. या सर्व प्रकारामुळे पोलिसांनी संगमनेर शहर व तालुक्यातली कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर सोडली आहे काय असा संशय व्यक्त केला जात आहे.

संगमनेर शहरासह तालुक्यात तब्बल चार पोलीस स्टेशन कार्यरत आहेत, तरीही अवैध उद्योग थांबण्याचे नाव घेत नाहीत. आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूचे गुत्ते, ढाब्यांवर होणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री आणि इतर धंदे जोमात सुरू आहेत. नुकताच सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आऊट पोस्ट आणि मोठ्या गावांमध्ये मटका, जुगार, गांजाचे अड्डे सातत्याने सुरू असून गुटखा व जनावरांची तस्करी राजरोस सुरू आहे. मालुंजे गावात अवैध गौण खनिज तस्करी वरून गोळीबाराची आणि तलवारीच्या हल्ल्याची घटना देखील घडली आहे. आरोपी पकडण्यासाठी येथील गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर आंदोलन देखील केले आहे. नुकताच तालुक्याचे हद्दीत मोठा गुटखा तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. तो पण पोलिसांमुळे नव्हे, तर अपघातामुळे समोर आला आहे.

पुणे जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या घारगाव हद्दीत तर वेश्याव्यवसाय, अमली पदार्थ, महामार्गावरील ढाबे आणि हॉटेल मधून होणारी देशी विदेशी दारूची अवैध विक्री आणि भंगाराच्या दुकानातून चोरीच्या मालाची खरेदी-विक्री खुलेआम सुरू आहे.
अवैध धंद्यांविरोधात विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते सातत्याने निवेदने देतात, आंदोलनाचे इशारे देतात. त्यानंतर पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) येते, एखादी वरवरची कारवाई करते आणि निघून जाते. पण, या कारवाईच्या पडद्यामागे अवघ्या दोन दिवसांत ‘छुपी सेटलमेंट’ होते आणि तिसऱ्या दिवशी हे धंदे पुन्हा दुप्पट वेगाने सुरू होतात हे चित्र आम्हाला नेहमीच पाहण्यास मिळते असे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संपूर्ण प्रकाराचे ‘सत्यशोधन’ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणे आता गरजेचे आहे. संगमनेर तालुका गुन्हेगारीच्या खाईत लोटला जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देऊन ‘खाकी’ची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.
