युरियासाठी काँग्रेस आक्रमक ; शासनाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

संगमनेर | प्रतिनिधी 

खरीप हंगामाच्या तोंडावर संगमनेर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा तीव्र होत असताना काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शासनाच्या ताब्यातील युरियाचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करण्याची जोरदार मागणी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, कारखान्याचे संचालक विजय राहणे, सचिन दिघे, सरपंच नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ, अमोल गुंजाळ, शुभम गुंजाळ, योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ, सागर वामन, नामदेव शिंदे, सुनील लांडगे, बाबासाहेब आभाळे, सचिन गुंजाळ, नानासाहेब ढगे, भाऊसाहेब बालवडे, लक्ष्मण गुंजाळ, अनिल लांडगे, सुदर्शन गुंजाळ, संगम लांडगे, सचिन लांडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील युरियाचा तुटवडा हा केवळ कृत्रिम नसून अनेक खत विक्रेत्यांकडे विक्रीसाठी युरियाचा साठाच उपलब्ध नाही. दुसरीकडे, युरिया उपलब्ध असल्याची चुकीची माहिती दिली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून कृषी विभागाविषयी नाराजी वाढत आहे.

सध्या खरीप हंगामात बाजरी, मका आणि सोयाबीन या पिकांसाठी युरियाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यामुळे शासनाच्या ताब्यातील बफर स्टॉक तातडीने खुला करून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून द्यावे, अन्यथा पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

तालुकाध्यक्ष अजय फटांगरे म्हणाले, “यापूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत युरिया उपलब्ध होत असे. मात्र आता शासन अपयश झाकण्यासाठी चुकीची माहिती देत आहे. शेतकऱ्यांना तातडीने बफर स्टॉकमधून युरिया उपलब्ध करून द्यावा.”

तर सचिन दिघे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “संगमनेर हा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा तालुका आहे. शासनाने तातडीने बफर स्टॉक खुला करावा. अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.” यावेळी विजय राहणे, नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ, योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ, सागर वामन आणि नामदेव शिंदे यांनीही शेतकऱ्यांच्या विविध अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.

काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे शासन युरियाचा बफर स्टॉक शेतकऱ्यांसाठी खुला करण्याबाबत काय निर्णय घेते, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!