‘टॉपटेन इम्पिरियल’मधील प्रस्तावित वाईन शॉपला तीव्र विरोध ; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, तीव्र आंदोलनाचा इशारा !

संगमनेर | प्रतिनिधी –

संगमनेर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या ‘टॉपटेन इम्पिरियल’ या नामांकित व्यावसायिक इमारतीमध्ये येऊ घातलेल्या प्रस्तावित वाईन शॉपला स्थानिक व्यावसायिक, महिला आणि नागरिकांनी अत्यंत तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्याकडे लेखी हरकत अर्ज दाखल करत या संशयास्पद स्थलांतराची सखोल चौकशी करण्याची आणि परवानगी तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परवानगी न नाकारल्यास ‘तीव्र जनआंदोलन’ छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

Excise विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात ? शासकीय नियम धाब्यावर !

या वाईन शॉपच्या मंजुरी प्रक्रियेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रचंड गोपनीयता बाळगल्याचा थेट आरोप हरकतीमध्ये करण्यात आला आहे. हे वाईन शॉप अहिल्यानगर शहरातून संगमनेर तालुक्यात स्थलांतरित होत आहे. यासाठी संगमनेर नगर परिषदेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असताना, तसे न करताच हालचाली सुरू आहेत असेही निवेदनात म्हटले आहे. अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ना-हरकत दाखल्याला (NOC) आणि इमारतीच्या सहकारी संस्थेच्या परवानगीला जाणूनबुजून बगल देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

‘टॉपटेन इम्पिरियल’ ही इमारत केवळ व्यावसायिक केंद्र नसून ते एक सुरक्षित कार्यस्थळ (Women Centric Working Atmosphere) म्हणून ओळखले जाते. या इमारतीत रिलायन्स डिजिटल, नामांकित ज्वेलर्स, फायनान्स कंपन्या, डेंटल क्लिनिक, ब्युटी पार्लर, शैक्षणिक क्लासेस, आणि हॉटेल्स आहेत. येथे शेकडो महिला कर्मचारी काम करतात आणि दैनंदिन खरेदीसाठी लहान मुले व महिलांची मोठी वर्दळ असते.

प्रस्तावित वाईन शॉपमुळे इतर व्यापारी गाड्यांमध्ये व्यवहार खरेदी नोकरीसाठी येणाऱ्या महिला ग्राहकांमध्ये असुरक्षिततेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण होईल. गाळ्यांसमोरील मोकळ्या जागेत आणि पार्किंगमध्ये मद्यपींच्या छेडछाडीचा आणि उघड्यावर दारू पिण्याच्या अड्ड्यांचा त्रास सहन करावा लागेल, अशी थेट भीती व्यक्त केली जात आहे.

अवघ्या ५० फूट अंतरावर असलेल्या ऐतिहासिक भगवान मारुती मंदिराच्या पावित्र्याला या वाईन शॉपमुळे थेट धक्का पोहोचणार आहे. धार्मिक भावना दुखावल्या जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

एका वाईन शॉपमुळे इतर सर्व नामांकित दुकाने, ऑफिसेस आणि शो-रुम्सच्या व्यवसायावर विपरित परिणाम होणार आहे. मद्यपींच्या सुळसुळाटामुळे सुसंस्कृत ग्राहक येथे येणे टाळतील, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. आधीच गजबजलेल्या या भागात बेशिस्त वाहनचालकांमुळे पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन अपघातांचे प्रमाण वाढेल. या इमारतीचे बांधकाम व्यावसायिक आणि सर्व गाळेधारकांनी एकत्र येऊन “इमारतीत मांस किंवा दारू विक्रीचा व्यवसाय करू देणार नाही” असा एकमुखी निर्णय घेतला होता. या निर्णयाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

“प्रस्तावित वाईन शॉप जर या संवेदनशील ठिकाणी स्थलांतरित झाले, तर संगमनेरमधील नागरिक आणि महिला रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील. यामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या गंभीर परिस्थितीला पूर्णपणे प्रशासन आणि संबंधित विभाग जबाबदार असतील असा इशारा देण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!