जोपर्यंत नाशिक–पुणे महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद ठेवा ; अन्यथा आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेसचा निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा
संगमनेर | प्रतिनिधी
पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत हिवरगाव पावसा येथील टोल वसुली तात्काळ बंद करावी, तसेच कंत्राटदार शंकर रामचंद्र इन्फ्रा प्रा. कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तिला कायमचे ब्लॅकलिस्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवार, दि. २० जुलै २०२६ पासून हिवरगाव पावसा टोलनाका कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण कानवडे यांनी दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांना देण्यात आले. निवेदनात महामार्गाच्या कामात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनानुसार, संगमनेर तालुक्यातील बोटा ते कर्हे घाट या परिसरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर आवश्यक दिशा फलक, चेतावणी फलक, रिफ्लेक्टर्स, ब्लिंकर्स आदी सुरक्षाविषयक साधनांचा अभाव असून कर्हे घाटात स्ट्रीट लाईटची सुविधा नसल्याने रात्री अपघातांचा धोका वाढला आहे. तसेच बोगद्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचत असून तेथेही पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अपारदर्शकता असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. रस्त्याला तडे जाणे, अचानक चढ-उतार निर्माण होणे तसेच स्टेटस हॉटेलजवळील पूल आणि रायतवाडी फाटा येथील पुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये ५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा तसेच शेकडो जण कायमचे अपंग झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. हे अपघात चालकांच्या चुकीमुळे नव्हे, तर कंत्राटदार कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून संबंधित कंपनीचे मालक, संचालक व मुख्य प्रकल्प अभियंत्यावर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंत्राटदाराकडून वसूल करणे, कंपनीचे टेंडर रद्द करून तिला कायमचे ब्लॅकलिस्ट करणे, सुरक्षा उपाययोजना पूर्ण होईपर्यंत कंपनीचे बँक खाते व महामार्गाचे काम सील करणे तसेच आयआयटी किंवा तत्सम स्वायत्त संस्थेमार्फत संपूर्ण कामाचे थर्ड पार्टी क्वालिटी आणि सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पुढील २४ तासांत आवश्यक सुरक्षा फलक, रिफ्लेक्टर्स, बॅरिकेडिंग व इतर उपाययोजना करण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यावेत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
प्रशासनाने पुढील सात दिवसांत योग्य ती कारवाई न केल्यास दि. २० जुलै २०२६ रोजी हिवरगाव पावसा येथील टोलनाका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
या निवेदनावर शहराध्यक्ष प्रविण अरुण कानवडे, महिला जिल्हाध्यक्ष वैशालीताई राऊत, प्रसाद गोरे, रईस पठाण, भाऊ म्हस्के, अमोल म्हस्के, मारुती सोनवणे आदींच्या सह्या आहेत.
