रोटरी डिस्ट्रीक्टच्या असिस्टंट गव्हर्नरपदी आनंद हासे यांची निवड
संगमनेर | प्रतिनिधी
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या रोटरी वर्ष २०२६–२७ साठी संगमनेरचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रो. आनंद किसन हासे यांची असिस्टंट गव्हर्नर म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांच्यावर रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ अकोले सेंट्रल या तीन क्लबच्या मार्गदर्शन, समन्वय आणि कार्यवृद्धीची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे प्रांतपाल रो. जयेशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली आनंद हासे हे या तीनही क्लबांना नेतृत्व विकास, वार्षिक नियोजन, सदस्यवाढ, द रोटरी फाउंडेशनचे उपक्रम, प्रभावी सेवा प्रकल्प आणि जिल्ह्याच्या उद्दिष्टांशी सुसंगत कार्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

आनंद हासे हे रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे माजी अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात फुलझडी हा उपक्रम, कोविड काळात पती गमाविलेल्या महिलांना पीठ गिरणी व शिलाई मशीनचे वितरण, तसेच आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाशी संबंधित अनेक समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वामुळे क्लबने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
व्यावसायिक क्षेत्रात आनंद हासे हे युवा पॉलीप्रिंट अँड पॅकेजिंग इंडस्ट्रीज तसेच दैनिक युवावार्ताचे संचालक आहेत. याशिवाय ते रोटरी आय केअर ट्रस्टचे विश्वस्त, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक आणि श्रीसंगम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आनंद हासे म्हणाले, “असिस्टंट गव्हर्नर म्हणून मिळालेली ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून ती अधिक जबाबदारीची आहे. प्रांतपाल रो. जयेशभाई पटेल यांच्या संकल्पनेनुसार तिन्ही क्लबसोबत समन्वय साधून अधिक प्रभावी, शाश्वत आणि समाजोपयोगी प्रकल्प राबविण्यावर भर देणार आहे.”
दरम्यान, त्यांच्या या निवडीबद्दल रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ तसेच सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
