अनिल कोळसे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई या राज्यातील पत्रकार संघटनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्ष (अहिल्यानगर) पदावर ज्येष्ठ पत्रकार अनिल कोळसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असून, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नियुक्तीपत्राद्वारे याची अधिकृत घोषणा केली.
गेली २० ते २२ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले अनिल कोळसे हे सामाजिक भान जपणारे आणि निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत त्यांनी पत्रकारितेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.

कोळसे हे ‘सार्वमंथन’ या दैनिकाचे संपादक असून, त्यांची शासकीय मान्यताप्राप्त ‘स्वराज प्रिंटिंग प्रेस’ देखील कार्यरत आहे. पत्रकारिता आणि मुद्रण व्यवस्थापन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अनेकदा पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने त्यांच्यावर अहिल्यानगर उत्तर नगर जिल्ह्याची धुरा सोपवली आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार जिल्ह्यात संघटना अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी ते प्रभावी काम करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अनिल कोळसे यांच्या या नियुक्तीचे पत्रकार, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. दरम्यान, अहिल्यानगर उत्तर नगर जिल्ह्यातील तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अनिल कोळसे यांनी दिली आहे.
