गरीबांना वेठीस धरून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही – आमदार अमोल खताळ
प्रशासनाने मानवी दृष्टिकोन आणि योग्य नियोजन ठेवावे
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराचा विकास हा सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला धक्का न लावता झाला पाहिजे. गरीबांना वेठीस धरून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही, तसेच शहराचा सर्वांगीण विकासही साधता येणार नाही, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
आमदार खताळ म्हणाले की, शहरातील अनेक हातावर पोट असलेले नागरिक छोट्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत कोणतीही पुरेशी पूर्वसूचना किंवा तयारीची संधी न देता अचानक अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधितांना त्यांचे साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पुरेसा वेळ देणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र, आवश्यक मुदत न देता थेट कारवाई करण्यात आल्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अतिक्रमणाचा प्रश्न सोडविणे आवश्यक असल्याचे मान्य करतानाच त्यांनी स्पष्ट केले की, कायद्याची अंमलबजावणी करताना मानवी मूल्ये आणि संवेदनशीलता यांचा विसर पडता कामा नये. गरीब व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारवाईपूर्वी संबंधितांना लेखी सूचना देणे, साहित्य हलविण्यासाठी पुरेसा अवधी उपलब्ध करून देणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था करण्यासारख्या उपाययोजना करणे गरजेचे होते, असेही त्यांनी सांगितले.
आमदार खताळ यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, विकास म्हणजे केवळ अतिक्रमण हटविणे नव्हे, तर नागरिकांचा विश्वास जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रशासनाने विकासकामे राबविताना सर्व घटकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले पाहिजेत. सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहावर गदा आणणारे निर्णय टाळले पाहिजेत आणि भविष्यात अशा कारवायांमध्ये योग्य नियोजन, पुरेशी पूर्वतयारी व मानवी दृष्टिकोन ठेवूनच कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“संगमनेर शहराचा विकास हा सर्व घटकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या हिताचा विचार करूनच झाला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांच्या उदरनिर्वाहावर गदा आणून विकास साधणे योग्य ठरणार नाही. भविष्यात अशा प्रकारच्या कारवायांमध्ये प्रशासनाने अधिक संवेदनशीलता, योग्य नियोजन आणि मानवी मूल्यांचा विचार करून निर्णय घ्यावेत.” — आमदार अमोल खताळ
