निधीची अजिबात चिंता करू नका – आमदार अमोल खताळ
कसारा येथे दीड कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण
संगमनेर / प्रतिनिधी
गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या विचारांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे विकासकामांसाठी आपण मोठ्या प्रमाणात निधी आणू शकलो आणि यापुढेही आणू. तुम्ही निधीची अजिबात चिंता करू नका. मात्र आगामी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत तुम्ही महायुतीला साथ द्या, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे सुमारे दीड कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश काळे, कसारा दुमालाचे सरपंच राजेंद्र त्रिभुवन, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक काळे, विजय महाराज डाहाळे, ज्ञानेश्वर गुंजाळ, विजय कांबळे, नारायण शिंदे स्वप्नील सातपुते, सागर वाळके, संकेत गुंजाळ, समीर वालझाडे, दत्तू नाईक, विकास सावंत, नामदेव अभंग, मनोज जाधव, अनिल खतोडे, महेश पंचारिया, पप्पू वालझाडे, आदिनाथ वाळके, पोपट गुंजाळ, शिवाजी वाळके, नितीन वाळके, संपत सावंत, ग्रामपंचायत अधिकारी सुनील खैरनार यांच्यासह ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, विकासकामांमध्ये स्पर्धा असावी, मात्र सर्वसामान्य जनतेपर्यंत सत्य पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. एखाद्या गावासाठी निधी मंजूर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काही जण त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी ‘हा निधी आम्ही आणला’ असे सांगतात. अशा वेळी हा विकासनिधी कोणाच्या माध्यमातून आला हे सांगण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना जाब विचारणे गरजेचे आहे.

अकोले बायपासवर अनेक वर्षांपासून रस्ता असतानाही तेथे प्रकाशव्यवस्था नव्हती. काही वर्षांपूर्वी या भागात दगडफेकीच्या घटनाही घडल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पाइपलाइनमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि अपघातांची समस्या लक्षात घेऊन तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देऊन प्रलंबित असणारा सर्व्हिस रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. अनेक गावांना 50 लाख रुपयांपर्यंत निधी देऊन दर्जेदार रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. ठेकेदारांनी गुणवत्तापूर्ण कामे केली पाहिजेत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदार खताळ यांनी दिला.
