हायवे ते राजापूर रस्ता काँक्रिटीकरण तातडीने करा ; राजापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या नाशिक–पुणे महामार्ग (बोगदा) ते राजापूर या महत्त्वाच्या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी राजापूरसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून संगमनेर–ढोलेवाडी–हायवे या रस्त्याचे उत्कृष्ट काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांच्या वाहतुकीला मोठा दिलासा मिळाला असून दळणवळण अधिक सुलभ झाले आहे.

याच धर्तीवर नाशिक–पुणे महामार्ग (बोगदा) ते राजापूर या रस्त्याचेही काँक्रिटीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा रस्ता संगमनेरच्या पश्चिम भागासह अकोले तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने दररोज हजारो नागरिक या मार्गाचा वापर करतात.

राजापूर, गुंजाळवाडी, चिकणी, निमगाव भोजापूर, जवळे, कडलग तसेच परिसरातील इतर गावांतील शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे. विशेषतः या भागातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल वेळेत बाजारपेठेत पोहोचविणे अधिक सोयीचे होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना शहरातील रुग्णालयात तातडीने हलविणेही सुलभ होणार आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शासनाने कोणताही विलंब न लावता या मार्गाच्या काँक्रिटीकरणास मंजुरी देऊन काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!