खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन ; तीन नव्या ग्रामपंचायतींची निर्मिती

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

अहिल्यानगर | प्रतिनिधी –

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीचे विभाजन करून खर्डा, नागोबाचीवाडी आणि पांढरवाडी अशा तीन स्वतंत्र ग्रामपंचायतींची निर्मिती करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्रात प्रसिद्ध केली असून, ती १७ जुलै २०२६ पासून लागू करण्यात आली आहे.

शासनाच्या अधिसूचनेनुसार, खर्डा ग्रामपंचायतीमध्ये खर्डा महसुली गाव, नागोबाचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये नागोबाचीवाडी व मुंगेवाडी, तर पांढरवाडी ग्रामपंचायतीमध्ये पांढरवाडी व दरडवाडी या महसुली गावांचा समावेश करण्यात आला आहे.

खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विभाजनाची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ही मागणी मार्गी लावण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या निर्णयामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या प्रशासकीय कामकाजात अधिक सुलभता येणार असून, स्थानिक विकासकामांना गती मिळण्यास मदत होईल. तसेच नागरिकांना शासकीय सेवा व नागरी सुविधा अधिक प्रभावी आणि वेळेत उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, “संबंधित गावांतील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, स्थानिक विकासाला प्राधान्य देत पुढील काळातही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,” अशी ग्वाही दिली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!