रस्त्याच्या कामात कुठलाही हलगर्जीपणा सहन करणार नाही – आमदार अमोल खताळ यांचा इशारा
साकूर – बिरेवाडी रस्त्याचे काम सुरु
संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील प्रलंबित असलेल्या साकूर–बिरेवाडी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, या कामाची आमदार अमोल खताळ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाहणी केली. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी रस्त्याच्या दर्जाची, गुणवत्तेची आणि कामाच्या प्रगतीची तपासणी केली.
यावेळी ठेकेदाराला स्पष्ट शब्दांत इशारा देत आमदार खताळ म्हणाले, “रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. काम नियोजित वेळेत आणि उच्च दर्जाचेच पूर्ण झाले पाहिजे.”

साकूर–बिरेवाडी रस्त्यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांतून सुमारे पावणे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
साकूर पठार भागाच्या दौऱ्यावर असताना आमदार खताळ यांनी अचानक या कामाची पाहणी केल्याने विकासकामांवर सातत्याने लक्ष ठेवून प्रत्यक्ष फिल्डवर उतरून तपासणी करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख, कायदा सेलचे जिल्हा संयोजक ॲड. अमित धुळगंड, भास्कर ढेंबरे, माजी सरपंच लहानू सागर, आनंदा सागर, नवनाथ ढेंबरे, चेतन फासाटे, संकेत सागर, सुभाष ढेंबरे, रोहिदास भोसले, लहानू पिंगळे, नवनाथ कोळपे, ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ ढेंबरे, डॉ. सुनील ढेंबरे, बाळू ढेंबरे आदी उपस्थित होते.

