मालपाणी बजाज शोरूममधील मारहाण प्रकरण.. 

ग्राहकावरील गुंडगिरीचे तीव्र पडसाद.. 

आरोपींच्या अटकेसाठी आंदोलन 

 संगमनेर | प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील कासारा-दुमाला येथील रहिवासी स्वप्नील रोहिदास सातपुते यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ५) संगमनेर येथील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनावर ग्रामस्थांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. ३० मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून, आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी यावेळी मोर्चेकर्‍यांनी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सातपुते आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत हे आपले नादुरुस्त दुचाकी घेऊन मालपाणी बजाज शोरूममध्ये गेले होते. वाहनाची जबाबदारी स्वीकारून त्याची पावती देण्याबाबत चर्चा सुरू असताना, शोरूम व्यवस्थापक सचिन पलोड व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली. एवढ्यावरूनच न थांबता त्यांनी फोन करून इतर लोकांना बोलावून घेतले आणि सातपुते व राऊत यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होऊनही संबंधित आरोपींना पोलिसांनी अद्याप गजाआड न केल्यामुळे कासारा-दुमाला आणि परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी परिसरातील नागरिक, महिला व तरुण मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी प्रशासकीय भवनावर मोर्चा नेला. 

या मोर्चादरम्यान आंदोलकांच्या हातात आरोपींचे फोटो असलेले फलक होते, तसेच सर्वांनी हाताला काळ्या फिती बांधून शोरूम व्यवस्थापन आणि पोलिसांच्या संथ कारभाराचा निषेध केला. आरोपींना तात्काळ अटक करा आणि पीडितांना न्याय द्या अशा घोषणांनी संपूर्ण शासकीय भवन परिसर दणाणून गेला होता.

मोर्चानंतर आंदोलकांनी प्रशासकीय भवनाच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना या कृत्याचा तीव्र शब्दांत धिक्कार केला. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींवर कठोर कलमान्वये कारवाई करण्यासाठी नागरिक एकवटले आहेत. आम्ही लोकशाही मार्गाने आमचा आवाज उठवत असून, पोलिस प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता निष्पक्ष चौकशी करावी आणि आरोपींना अटक करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे उपोषण करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

या आंदोलनात स्वप्नील सातपुते यांच्या कुटुंबीयांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले आणि या प्रकरणात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!