संगमनेर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ !
दोन दिवसात तीन घरफोड्या…
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर शहर व तालुक्यात पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र रंगविले जात असले तरी चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या सातत्याने चालू आहेत. पोलिसांचा कुठलाही धाक उरला नसल्याचे हे चित्र असून संगमनेर शहरात मागील दोन दिवसात तीन घरफोड्या झाल्या असून यात सोन्या चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले आहेत. मागील घरफोड्यांचे चोऱ्यांचे अनेक गुन्हे तपासावर असतानाच अशा घटना सातत्याने घडत आहेत. पोलिसांना चोरटे सापडत नाहीत. मात्र अवैध धंदे आणि इतर उद्योग पोलिसांच्या आशीर्वादाने सुरूच असल्याचे चित्र नेहमीच पाहण्यास मिळते. गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच आता संशय व्यक्त होऊ लागला आहे.
दोन दिवसात शहरात झालेल्या या तीन घरफोड्यांमधून सुमारे 3 लाख 48 हजार रुपयांचा सोने चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे, असा आकडा पोलिसांचा आहे.

शहरातील रहेमत नगर जोर्वे नाका परिसरात झालेल्या घरफोडीमध्ये 1 लाख 10 हजार रुपयांची सोन्याची चैन चोरून नेण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे घरात झोपलेल्या व्यक्तीच्या गळ्यातून ही सोन्याची चैन चोरून नेण्यात आलेली आहे. या प्रकरणी आशिया गुलाम शेख यांनी फिर्याद दिली असून झीनत नाजिम अन्सारी असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुंजाळवाडी या ठिकाणी घरफोडी करून 1 लाख 88 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल सीसीटीव्ही कॅमेरे अशी चोरी करण्यात आलेली आहे. ॲड. राजेंद्र दत्तात्रय दवंगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील खिडकीचे ग्रील उचकटून घरात प्रवेश करून वरील सर्व रक्कम आणि दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शहरातील स्नेह बंगला शारदा बेकरीच्या पाठीमागे कॉलेज रोड गुंजाळवाडी शिवार येथील बाबासाहेब दादाभाऊ वर्पे यांच्या घरी देखील चोरी झाली असून या घरफोडीत 50 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवून नेले आहेत. या ठिकाणीही खिडकी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सलग दोन दिवस झालेल्या या घरफोड्या तपास आणि चोरांना पकडण्याचे आव्हान संगमनेर शहर पोलिसांसमोर आहे. मागील घरफोड्यात काय तपास पोलिसांनी केला आहे हा संशोधनाचा विषय आहे. बस स्थानकावर होणारे चैन स्नॅचिंग पाकीट मारी हे चालूच आहे. एकंदरीत शहर पोलिसांचा धाक फक्त सर्वसामान्य जनतेवर असून अवैध उद्योग करणारे चोरटे मात्र त्यांचा कार्यभाग साधताना दिसत आहेत.
