मालपाणी बजाज शोरूमच्या मॅनेजरसह कर्मचाऱ्यांकडून ग्राहकाला बेदम मारहाण ! —

पोलिसांवर प्रचंड दबाव ; 10 तास उशिराने गुन्हा दाखल….

मुजोर गुंडगिरीला आळा घालणे आवश्यक

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूम मध्ये दुचाकीच्या सर्व्हिसिंग साठी आलेल्या ग्राहकाच्या नातेवाईकाने शोरूम मध्ये मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा राग आल्याने ग्राहकाच्या नातेवाईकाला मॅनेजरसह कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली. मात्र पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याने सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानंतर तब्बल 10 ते 12 तास उशिराने 5 आरोपींसह इतर 10 ते 15 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन पलोड, मंगेश मिसाळ विष्णू मोहरीकर सचिन धुमाळ व धारणकर अशी आरोपींची नावे आहेत. या पाच जणांसह इतर दहा ते पंधरा जणांवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात फिर्यादीने दिलेली फिर्याद पुढील प्रमाणे आहे. मी स्वप्निल रोहीदास सातपुते (वय- 25 वर्षे धंदा- शेती रा. कासारा दुमाला, संगमनेर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) समक्ष पोलीस स्टेशनला हजर होऊन फिर्याद देतो की, मी वरील ठिकाणी रहावयास असून शेती व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. 

माझे सासरे त्रिंबक लक्ष्मण राऊत (रा. जामगाव, ता. अकोले) यांनी त्यांच्या मुलाच्या नावावर मालपाणी बजाज शोरुम, मार्केट यार्ड समोर, संगमनेर येथून बजाज कंपनीची चेतक (इलेक्ट्रिक) गाडी नं. एम एच 17 डी जी 6084 ही एक वर्षापूर्वी विकत घेतलेली आहे. सदर गाडी जामगाव ता. अकोले येथे बंद पडलेली होती. त्यामुळे मी जामगाव येथे जाऊन सासरे यांचे मदतीने सदरची गाडी पिकअप मध्ये टाकुन मालपाणी बजाज शोरुम संगमनेर येथे दि. 30/05/2026 रोजी 09/30 वाजता घेवून आलो होतो.

दि. 30/05/2026 रोजी 09/30 वाजेच्या सुमारास मालपाणी बजाज शोरुम संगमनेर येथे सासरे त्रिबंक राउत यांची चेतक बजाज इलेक्टीक गाडी रिपेअर करण्यासाठी आणली होती व मी तसेच सासरे शोरुमच्या कार्यालयात गेलो व तेथील कर्मचाऱ्यांना आमची गाडी जमा करुन घ्या आम्हाला पावती दया आम्हाला अर्जंट बाहेर जायचे आहे. असे आम्ही म्हणालो तेव्हा तेथील कर्मचारी आर्धा तास थांबा असे म्हणाले आम्ही आर्धातास झाल्यानंतर पुन्हा त्यांना म्हणालो की, आम्हाला बाहेर जायचे आहे. गाडी ताब्यात घ्या व आम्हाला पावती द्या. असे म्हणालो. 

त्यावेळी मॅनेजर सचिन पल्लोड हा मोठ्याने बोलू लागला त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, हे तुमचे असे बोलणे बरोबर नाही असे म्हणून मी मॅनेजर सचिन पल्लोड यांची शुटींग काढू लागलो मी शुटींग काढल्याचा राग आल्याने मैनेजर सचिन पल्लोड हा मला व सासरे त्रिंबक राऊत यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करु लागला. त्यावेळी शोरुम मधील 10 ते 15 कर्मचारी तेथे आले व त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील दोन कर्मचाऱ्यांनी एकाने रॉडने (लोखंडी) व एकाने स्क्रुड्रायव्हरने मला मारहाण केली. सदर मारहाणीत माझ्या छातीवर, हातावर, पायावर, पोटावर, तोंडांवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात सचिन पल्लोड याने माझा गळा धरुन ‘मी तुझा गळा दाबुन मारुन टाकीन’ अशी धमकी दिली. मला मारहाण करणाऱ्यांमध्ये सचिन पल्लोड, मंगेश मिसाळ, विष्णु मोहरीकर, सचिन धुमाळ, धारणकर (पुर्ण नाव व पुर्ण पत्ता माहित नाही) ईतर अनोळखी इसम होते. 

पोलिसांवर दबाव – गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ — फिर्यादीला मारहाण झाल्यानंतर येथील खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. पोलिसांनी या संदर्भात कुठलीही दाखल घेतली नाही. गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादीच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. दिवसभर पोलीस ठाण्यात बसून राहिलेल्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली नाही. पोलिसांवर प्रचंड दबाव असल्याचे चित्र दिसून येत होते. रात्री उशिराने घटना घडल्यानंतर तब्बल 10 ते 12 तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाणीचे व्हिडिओ दिवसभर सर्वत्र व्हायरल झाले होते. तरीही पोलिसांना जाग आली नाही. सोशल मीडियातील एका ग्रुप वर फिर्यादीला मारून टाका अशी चर्चा देखील सुरू असल्याची माहिती समजली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!