तीन-चार वेळा उद्घाटन केलेल्या…

सावरगावतळच्या रस्त्याची दैन्यवस्था !

टक्केवारीसाठी कामे रखडवली जात असल्याची चर्चा 

संगमनेर प्रतिनिधी —

तीन-चार वेळा उद्घाटनांचा फार्स करून चंदनापुरी ते सावरगाव तळ या संगमनेर तालुक्यातील रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. परंतु दोन वर्षे होऊनही या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून रस्त्याचे काम अर्धवट आहे. हे काम उत्कृष्ट आणि चांगल्या रीतीने पूर्ण झाले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ते सावरगाव तळ या रस्त्याचे जवळपास दोन वर्षांपासून रुंदीकरण व डांबरीकरण काम सुरू आहे. राजकीय पुढार्‍यांनी नेत्यांनी 3 ते 4 वेळा कामाचे उद्घाटन देखील केले. पण अजूनही काम अर्धवट आहे. रस्त्याची दुर्दशा झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तालुक्यामध्ये मागील दीड वर्षापासून टक्केवारी वाढली असल्याचा देखील आरोप होत असून या टक्केवारीमुळेच रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे विकास कामे रखडली आहेत. रस्त्यांची कामे तशीच पडून आहेत. फक्त सोशल मीडिया आणि फ्लेक्स बाजी यातच धन्यता मानली जात असल्याचे बोलले जाते. याबाबत सावरगाव तळ येथील ग्रामस्थांनी ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, ठेकेदार 2 दिवस काम करतो तर पंधरा दिवस काम बंद ठेवतो. परत कामाकडे डोकावत पण नाही. प्रशासनाचे तर कामाकडे अजीबातही नाही. अर्धवट कामामुळे चंदनापुरी ते सावरगाव तळ परिसरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष असल्याचा फायदा ठेकेदार घेत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

पुढील आठ दिवसांत काम पूर्ण झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यातील असा इशारा सावरगाव तळ येथील युवक कार्यकर्ते व नागरिकांनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!