पोलिसांविषयी अभद्र टिप्पणी करणाऱ्या पांडेवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी !
संगमनेर प्रतिनिधी —
परतवाडा येथील सभेत पोलीस प्रशासनाबद्दल आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या अटल पांडेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. संगमनेर शहर पोलीस स्टेशनला या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, परतवाडा येथे आयोजित ‘विराट हिंदू जनसभा एवं नवकन्या पूजन’ कार्यक्रमात अटल पांडे (सचिव राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) या वक्त्याकडून व्यासपीठावरून अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन पोलीस प्रशासनाचा अपमान करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्यांचा उल्लेख “मर्द की औलाद हो तो” आणि “खाकी वर्दीतले हिजडे” अशा अत्यंत आक्षेपार्ह, हीन आणि प्रक्षोभक शब्दांत करण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट होते.

• प्रशासनाचा अवमान: रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस दलाचा जाहीर सभेत असा अपमान करणे, हा केवळ व्यक्तीचा नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलाच्या अस्मितेचा अवमान आहे.
• सामाजिक तेढ: अशा प्रक्षोभक भाषणामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून, सामान्य जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी करण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न दिसून येतो.

• कायद्याचे उल्लंघन: लोकसेवकांना त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करणे आणि त्यांचा सार्वजनिकरीत्या अपमान करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
महाराष्ट्र पोलिसांची एक गौरवशाली परंपरा आहे. अशा प्रकारे खालच्या थराची भाषा वापरून पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करणाऱ्या प्रवृत्तींचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो.
आमची मागणी:
तरी, या प्रकरणाची सखोल चौकशी करून, ज्या व्यक्तीने सदर प्रक्षोभक आणि अपमानकारक वक्तव्य केले आहे, त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, निवेदनावर अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, अरुण चव्हाण, सतीश खताळ, रवींद्र हासे प्रवीण हासे आदींची नावे व सह्या आहेत.
