शनि मंदिरासमोरील दगडी रस्ता झाला खराब ; ठेकेदारावर कारवाईची मागणी
युवा सेनेचे अमोल डुकरे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
संगमनेर प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील महत्त्वाचे धार्मिक स्थान असलेल्या रंगार गल्ली येथील शनी मंदिरासमोर तयार करण्यात आलेला दगडी रस्ता हा खराब होत असून रस्त्याचे काम निकृष्ट असल्याने ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी युवा सेनेचे विधानसभा प्रमुख अमोल डुकरे (ठाकरे शिवसेना) यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्र. १३ व १४ मधील शनि मंदिरासमोर नव्याने तयार करण्यात आलेल्या दगडी रस्त्याचे काम खराब झाले आहे. खेदाची आणि संतापजनक बाब अशी की, अवघ्या एका महिन्यापूर्वी मोठा खर्च करून हा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु महिना उलटायच्या आतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, अख्खे दगड मोकळे होऊन बाहेर आले आहेत.

प्रामाणिक करदात्यांच्या पैशांची झालेली ही उधळपट्टी आणि प्रशासकीय अनास्थेबाबत खालील गंभीर मुद्दे आपल्यासमोर मांडत आहोत. महिनाभरही न टिकणारा रस्ता तयार करणाऱ्या कंत्राटदाराने कामाचा दर्जा राखला की फक्त स्वतःचे आणि हितसंबंधीयांचे खिसे भरले ? असा रास्त संशय आज सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. शनि मंदिर परिसर हा गजबजलेला असून येथे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची सतत वर्दळ असते. रस्त्यावरून उखडलेल्या दगडांमुळे येथे कधीही अपघात घडू शकतो. एखाद्या निष्पाप नागरिकाला गंभीर दुखापत झाल्यावर किंवा जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का ?

आमच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
१. या निकृष्ट रस्त्याची कंत्राटदाराच्या खर्चाने तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी.
२. संबंधित भ्रष्ट कंत्राटदाराला (ठेकेदाराला) तात्काळ काळ्या यादीत टाकून त्याच्यावर कडक
कायदेशीर कारवाई व्हावी.
३. या कामाचे ऑडिट करून दोषी अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई व्हावी.
नेहमीप्रमाणे या गंभीर विषयावर डोळे झाकून गप्प न बसता, प्रशासनाने आपले कर्तव्य चोख बजावावे हीच समस्त संगमनेरकर नागरिक म्हणुन मागणी आहे. अन्यथा, सबंधित ठेकेदार व अधिकारी याच्या ‘ढिम्म’ कारभाराविरोधात शिवसेना स्टाईल ने आंदोलन करावे लागेल, ज्याची संपूर्ण जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची असेल असेही निवेदनात शेवटी म्हटले आहे
