संगमनेर नगरपालिका कचरा व्यवस्थापनातून लाखो रुपये उभे करणार — मुख्याधिकारी रामदास कोकरे
संगमनेर दि. 5 प्रतिनिधी –
संगमनेर शहरातून गोळा होणारा कचरा हा लाखमोलाचा आहे. कचरा व्यवस्थापनातून लाखो रुपये उभे करून ते शहराच्या विकासासाठी वापरण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संगमनेर शाखेने आयोजित केलेल्या कला महोत्सव प्रसंगी ते बोलत होते.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संगमनेर शाखेतर्फे दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार कला महोत्सव यंदा दिगंबर सराफ विद्यालय, संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता. सदर महोत्सवात नाटिका, नाट्यछटा, रंगभरण, भेटकार्ड इत्यादी विविध स्पर्धांमधून सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.या महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे, बाल विकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रा. डॉ. संजयकुमार दळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

याप्रसंगी डॉ गाडगीळ यांनी नृत्य, नाट्य संगीत यांच्या निर्मितीचे मूळ विद्यार्थांना समजावून सांगितले . तसेच संगमनेर नाट्यपरिषदेच्या सहकार्याने लौकरच काही नवीन उपक्रम आयोजित करण्यासाठी आपली संस्था संपूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रामदास कोकरे यांनी सांस्कृतिक उपक्रम म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुक्त आविष्कार असल्याचे प्रतिपादन केले.

कोणत्याही कलेची आवड सुसंस्कृत नागरिक तयार करण्यात मोलाचे योगदान देत असते. लौकरच संगमनेर शहराच्या वैभवात भर टाकणारे अनंत फंदी नाट्यगृह सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील एक परिपूर्ण नाट्यगृह म्हणून उभे राहील.
संगमनेर शहराचा कचरा खऱ्या अर्थाने लाख मोलाचा आहे असे सांगून लाखो रुपये या कचऱ्याच्या माध्यमातून उभे राहण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. लौकरच कचरा व्यवस्थापन आणि समाज जागृती अभियान अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल असेही कोकरे म्हणाले.

परिषदेचे अध्यक्ष डॉ संजयकुमार दळवी यांनी नाट्य परिषद संगमनेर शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगून नजीकच्या काळात आणखी विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. विविध कलाप्रकरातील कलाकार अथवा सांस्कृतिक क्षेत्राची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी सभासद होण्यासाठी आपणाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

विविध स्पर्धांमधून काशेश्वर विद्यालय, ज्ञानमाता विद्यालय, विद्यालय, दि.ग. सराफ विद्यालय, बी. जी. डेरे इंग्लिश मिडीयम स्कूल, पी.जे. आंबरे पाटील कन्या विद्या मंदिर , जिजामाता इंग्लिश मिडीयम स्कूल, जाजू इंग्लिश मिडीयम स्कूल, शिवशंकर विद्यालय, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालय अशा अनेक शाळेतील विद्यार्थांनी विविध पारितोषिके पटकावली.
शाळेतून सांस्कृतिक विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील शिक्षकांना प्रोत्साहन म्हणू ‘ उपक्रमशील शिक्षक ‘ भारती चौधर, योगिता पाटील, प्राजक्ता कासार, शैलजा गाडे यांचा तर उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून कारभारी वाकचौरे यांचा गौरव करण्यात आला.

विविध स्पर्धांचे परीक्षण शशांक गंधे, राजाभाऊ भांडगे, नंदा बागुल, राजू आत्तार, राधा चौहान, योगिता पाटील, डॉ. संजीवनी ब्राह्मणे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सूर्यवंशी यांनी केले. या प्रसंगी विविध स्पर्धा प्रमुख सुभाष कानडे, धनंजय ढोले, दत्ता बटवाल, प्रशांत पेडणेकर उपाध्यक्ष बाबासाहेब मेमाणे ,कोषाध्यक्ष मोहसीन शेख, प्रमुख कार्यवाह विशाल कदम, विठ्ठल मुंगसे तसेच विद्यालयाचे द्वारकानाथ जाधव, संजय गुंजाळ, मंडलिक तसेच मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते.
