रात्रभर सुरू राहणाऱ्या बसस्थानकासमोरील हॉटेल कश्मीरवर कारवाई

हॉटेल चालकाला अटक

प्रतिनिधी —

मध्यरात्रीच्या वेळी सुरू असलेल्या संगमनेर बस स्थानकासमोरील हॉटेल कश्मीर वर कारवाई करून संगमनेर शहर पोलिसांनी हॉटेल चालकाला अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशाने ही कारवाई करण्यात आली.

अकबर नजीम शेख (वय ४३, राहणार कुरण रोड, गल्ली नंबर ११, संगमनेर) असे हॉटेल मालकाचे नाव आहे.

बहुचर्चित आणि नेहमीच वादग्रस्त असलेल्या संगमनेर बसस्थानकासमोरील हॉटेल कश्मीरवर झालेली ही कारवाई संगमनेरकरांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली आहे.

संगमनेर शहरासमोरील हे हॉटेल दिवसा आणि रात्रभर देखील सुरूच असल्याचे नेहमी आढळून आले आहे. याविषयी अनेक तक्रारी आणि सोशल मीडिया मधून चर्चा देखील झालेल्या आहेत. वेळोवेळी रात्रीच्या वेळी हे हॉटेल बंद करावे अशी मागणीही झाल्याचे माहिती समोर येते.

संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील सर्व व्यावसायिकांना रात्री दहा वाजेनंतर व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. रात्री दहा वाजेच्या दरम्यान शहर पोलिसांची गाडी शहरातून फिरत असते आणि सर्वांना आपापली दुकाने बंद करण्यास सांगते. त्यानुसार सर्व दुकाने बंद केली जातात. परंतु बस स्थानकासमोरील हे एकमेव असे हॉटेल आहे की ते संपूर्ण रात्रभर सुरू असते आणि त्या ठिकाणी वर्दळ देखील असते.

बसस्थानकासमोर असलेले हे हॉटेल रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांना आणि बस चालक, वाहकांना सुद्धा चहा पाण्याची सोय उपलब्ध करून देत होते. तसेच रात्री उशिरा व पहाटेपर्यंत पोलिसांची देखील चहा पाण्याची व्यवस्था या हॉटेलवर होत होती. शिवाय या हॉटेलवर रात्री अवैध धंदे करणारे आणि विशेषतः वाळू तस्करांचा आणि गोवंश हत्यासंबंधी असलेल्या उद्योगी लोकांचा राबता असल्याची चर्चा नेहमीच होती. त्यामुळे या हॉटेलवर कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी रात्री प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे पोलीस नाईक मालुंजकर यांना फोन करून तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यास सांगितले. संगमनेर पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार भागा धिंदळे आणि बीट अंमलदार पारधी यांनी देखील या कारवाईत सहभाग घेतला.

बाळासाहेब भाऊसाहेब गाडेकर पोलीस कॉन्स्टेबल संगमनेर शहर पोलीस स्टेशन यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा कायदा १९५५ चे कलम ३,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच विनापरवाना वापरण्यात येत असलेल्या घरगुती वापराच्या दोन भारत गॅस कंपनीच्या लाल टाक्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!