संगमनेर – लोणी मार्गावर अज्ञात वाहनाने बिबट्याला उडवले !

प्रतिनिधी —

संगमनेर – लोणी मार्गावर सोमवारी सकाळी रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला असून या बिबट्याला मोठ्या शिताफीने वनविभागाने ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी निबांळे येथिल रोपवाटिकेत हालवले असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास संगमनेर – लोणी महामार्गावरील चिचंपूर फाट्यालगत असलेल्या अस्मिता डेअरी जवळ एक भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला बेदरकारपणे उडवले व सुसाट वेगाने ते वाहन पुढे निघून गेले. जोरदार प्रहार झाल्यामुळे हा बिबट्या जबर जखमी होत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात जाऊन पडला होता. येथील स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली.

वनक्षेत्रपाल माळी, वनपाल प्रशांत पुंड, वनकर्मचारी अशोक गिते, रवीद्रं पडवळ, सोनवणे, जारवाल व मुंढे यांच्यासह आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार शांताराम झोडगे व संतोष शिदें घटनास्थळी हजर झाले होते.

दरम्यान बिबट्याचा अपघात झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने वेदनेने विव्हळत असलेल्या जखमी बिबट्याला पाहण्याबरोबरचं फोटो व विडिओ काढण्यासाठी लोकानी मोठी गर्दी केली होती. यावेळी वनविभागाने काठीच्या साह्याने बनवलेल्या फाशाच्या मदतीने बिबट्याला अलगद पिजंऱ्यात टाकले. यानंतर या बिबट्याला निबांळे येथिल रोपवाटिकेत उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अंदाजे ३ वर्ष वयाचा नर जातीचा बिबट्या असल्याची माहिती वनविभागाने दिले आहे. तर अपघातात या बिबट्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याबरोबरचं कबंरेला मोठी दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!