सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस-ट्रकची समोरासमोर धडक, १० प्रवाशांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

नाशिकमधील पाथरे या भागात सिन्नर-शिर्डी मार्गावर खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे.

मृत्यूंमध्ये सहा महिलांचा समावेश असून दोन पुरुष व दोन लहान मुले आहेत. वावी पाथरे दरम्यान पहाटे सहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.

शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशान्येश्वर मंदिराच्या कमानी जवळ हा भीषण अपघात झाला. अंबरनाथ उल्हासनगर भागातून रात्री साडेअकराच्या सुमारास गाईड कंपनीची खाजगी आराम बस (क्रमांक एम एच ४ एफ के २७५१) सुमारे ५० प्रवाशांना घेऊन शिर्डी कडे निघाली होती.

शिर्डी महामार्गावर वावी गावानंतर आराम बस व ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन त्यानंतर खाजगी बस उलटली. या अपघातात दहा प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आराम बस मधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी आहेत.

घटनास्थळी वाहतूक कोंडी झाली होती. सुमारे सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह वावी पोलिसांचे पथकही घटनास्थळी हजर झाले होते. स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत कार्य राबवून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. अंबरनाथ उल्हासनगर ठाणे येथून काही खाजगी बस शिर्डी येथे साईबाबा दर्शनासाठी आलेल्या होत्या अशी माहिती समजली आहे. अपघातग्रस्त बस त्यामधील एक असल्याचे समजते. सौजन्य दैनिक लोकसत्ता, लोकमत

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!