भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी
संगमनेर – अकोले रस्त्यावरील दुर्घटना
प्रतिनिधी —
संगमनेर-अकोले रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भरधाव दुधाच्या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात ऋषीकेश उमाजी हासे (वय २० वर्षे), सुयोग बाळासाहेब हासे (वय २० वर्षे) निलेश बाळासाहेब सिनारे (वय २६ वर्षे) सर्व रा.चिखली, ता. संगमनेर अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. तर संदीप भाऊसाहेब केरे (वय ३२ वर्षे रा. चिखली ता. संगमनेर) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

अपघाग्रस्त तरुण दुचाकीवरून अकोलेच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी एक दुधाचा टँकर भरधाव वेगात येत होता. मंगळापूर परिसरात या टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

