- चार वर्षाच्या बालिकेवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या असलेल्या खांडगाव शिवारातील बिरोबा वस्तीवर बिबटयाने एका ४ वर्षाच्या बालिकेवर प्राणघातक हल्ला केला.

या हल्ल्यात मुलगी गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची घटना सोमावारी सायंकाळी घडली आहे. जखमी मुलगी विजय बालोडे यांची असून तिचे नाव ईश्वरी आहे. या घटनेने खांडगाव परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून बिबट्या नरभक्षक असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

जखमी बालिकेच्या चेहर्यावर, मानेवर झालेल्या गंभीर इजेमुळे बिबट्या चवतावळलेला असावा असा स्थानिक लोकांचा अंदाज आहे.
सदर मुलीवर मेडिकव्हर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून वन विभागाला याबाबतची याबाबतची माहिती कळविण्यात आली आहे. वन विभागाने त्वरीत पिंजरा लावून प्राणघातक हल्ला करणार्या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

खांडगाव येथील बिरोबा वस्तीवर रहिवाशी असलेले विजय सखाराम बालोडे यांची मुलगी ईश्वरी घराबाहेर खेळत असतांना दबक्या पावलाने आलेल्या बिबट्याने सदर मुलीवर झडप घालून तिला गंभीर जखमी केले. तिच्या मानेवर, डोक्यावर, चेहर्यावर गंभीर जखमा झाल्या. शरीरावर इतर ठिकाणीही बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या आहेत.

दरम्यान संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी रुग्णालयात जाऊन मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली व विचारपूस करत त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.

