हरिश्चंद्रगडावर पर्यटकाचा मृत्यू !
दाट धुके, थंड वारे आणि पाऊस यामुळे रस्ता चुकले…
प्रतिनिधी —
हरिचंद्र गडावर पर्यटक भरकटल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बाळू नाथाराम गिते (रा.कोहगाव, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पुणे जिल्ह्यातून सहा तरुण हरिचंद्रगडावर पर्यटनासाठी आले होते. एक (ऑगस्ट) तारखेला सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्यांनी तोलार खिंडीतून गडावर चढण्यास सुरुवात केली होती. मात्र दाट धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने दोन दिवस हरिचंद्र गडाच्या जंगलात कपारीत ते मुक्कामाला होते. गड परिसरात असणारी थंडी आणि पावसाने एका पर्यटकाची प्रकृती खालावल्याने तसेच रात्रभर थंडीने काकडल्याने बुधवारी सकाळी १० वाजता एका पर्यटकाचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बाळू नाथाराम गीते असे मृत्यु झालेल्या पर्यटकाचे नाव आहे.
मयत बाळू गीते यांच्यासोबत अनिल मोहन आंबेकर, गोविंद दत्तात्रय आंबेकर, तुकाराम आसाराम तीपाले, महादू जगन भुतेकर, हरिओम विठ्ठल बोरुडे हे सर्व पुण्यातील कोहगाव येथील राहणारे पर्यटक हरिश्चंद्रगडावर येतांना जंगलात रस्ता भरकटले होते.
मुंबई येथील एका गृपने गाईड बाळू रेंगडे यास सदर घटनेची माहिती दिली. बाळू रेंगडे हे रात्रीच घटनास्थळी पोहचले. त्यानंतर त्यांनी तोलारखिंड येथील तपासणी नाक्यावरील वन संरक्षक मजूर महादू भांगरे, विजय नाडेकर, गौरव मेमाने, शरद भांगरे आणि राजूर पोलिसांनी पाचनई गावकरी आणि वनविभागाच्या मदतीने मयत व्यक्तीसह बाकीच्या पर्यटकांना गडावरून रेस्क्यू करून खाली आणले असून त्यातील तीन जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
मयत बाळू गीते यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. मुंढे व पो.कॉ.सांगळे हे करीत आहेत.
