अकोले तालुक्यात आढळल्या अल्पवयीन माता !

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

अकोले तालुक्यात अल्पवयीन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे अकोले तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण अद्यापही घटलेले नसल्याचे उघड होत आहे.

अकोले तालुक्यातील दरमहा गरोदर व स्तनदा मातांचा होणाऱ्या सर्वेक्षणात यातील काही मुली प्रसूतही झाल्या असल्याची माहिती देखील समोर आली आहे. विशेष म्हणजे अनेक अल्पवयीन मातांची नोंद शासकीय दप्तरी केली जात नसल्याचे बोलले जात आहे.

याचबरोबर अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढते असल्याची माहिती समजली असून महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना,अकोले तालुक्यातील बालमातांची आकडेवारी समोर आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

अकोले तालुक्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अल्पवयात पळून जाऊन विवाह करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली. पळून जाऊन लग्न करत असल्याचे प्रकार घडत आहेत.

तालुक्यात महिला व बालविकास विभागाचे अकोले व राजूर असे दोन प्रकल्प कार्यालय कार्यरत असून अकोले प्रकल्पांतर्ग एकूण 337 अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. दरमहा अंगणवाडी सेविकांकडून गरोदर व स्तनदा मातांचे सर्वेक्षण केले जाते व त्याअंतर्गत पोषण आहार वितरित केला जातो. याच सर्वेक्षणातून अल्पवयीन मातांची माहिती समोर आली आहे.

मुलगी वयात आली की पळून जाईल व लग्न करेल, या भीतीपोटी अनेक पालक अल्पवयातच मुलींचे लग्न करून देत असल्याचे समोर येत आहे. यामुळे अल्पवयीन मातांची संख्या वाढत असून, लहान वयातच विवाह झाल्याने या मुली आरोग्यदृष्ट्या क्षीण होत जातात व विविध आरोग्य समस्या निर्माण होतात.

सन 2022 ते 25 या कालावधीत सुमारे 345 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती मिळाली आहे. महिला व बालविकास विभागाच्या दरमहा होणाऱ्या गरोदर व स्तनदा मातांच्या सर्वेक्षणात अनेक जाणीवपूर्वक नोंद केली जात असल्याचे सांगितले जात असून अशा नोंदी टाळणाऱ्यांवर अकोले तहसीलदारांनी कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!