भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखड्या’ची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक ; जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले सादरीकरण

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  —

नाशिक येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ‘शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक आहे.भाविकांची सुरक्षा, आरोग्य व वाहतूक नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देत या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज येथे दिले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे आयोजित बैठकीत मुख्य सचिव अग्रवाल बोलत होते. या बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सादरीकरणाद्वारे तयारीचा सविस्तर माहिती सादर केली. नाशिक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या एकूण भाविकांपैकी सुमारे २० ते २५ टक्के भाविक शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. यामध्ये वाहतूक, पार्किंग, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे. कुंभमेळा कालावधीत शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार शहराबाहेर व मंदिरालगत सुमारे ९४ हेक्टर क्षेत्रावर ८ नवीन पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली असून, तेथे स्मार्ट पार्किंग व शटल बस सेवेचा समावेश असेल.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या गाड्या अवघ्या १५-२० मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत संवेदनशील ठिकाणांवर ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाईल.

भाविकांच्या मदतीसाठी व गर्दी नियोजनासाठी विशेष प्रशिक्षित ‘क्राउड मार्शल्स’ (Crowd Marshals) तैनात करण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधेच्या दृष्टीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व परिसरातील इतर रुग्णालये सुसज्ज ठेवण्यात येणार असून, अग्निशमन दलासाठी नवीन मल्टीपर्पज वाहने व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने शिर्डी विमानतळाची क्षमता वाढवून दररोज २० उड्डाणांचे नियोजन तसेच देशभरातील १३ प्रमुख शहरांशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटीचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिककरिता २००, तर छत्रपती संभाजीनगर व पुण्यासाठी प्रत्येकी ४० जादा बसेसचे नियोजन आहे. शनिशिंगणापूर येथेही स्वतंत्र पार्किंग व दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या या सर्वंकष नियोजनाचे मुख्य सचिव अग्रवाल यांनी कौतुक करत, सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सोयी-सुविधा देण्याचे काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!