चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  —

अर्जदार व सामनेवाला यांचा विवाह दि. १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला होता. सन २०२० व २०२१ मध्ये त्यांना दोन कन्यारत्ने प्राप्त झाली. संसार सुरू असताना छोट्या-मोठ्या कुरबुरी होत राहिल्या. त्यातून गैरसमज वाढत गेले आणि सन २०२१ पासून दोघेही वेगवेगळे राहत होते. परस्परांतील मतभेद अधिक तीव्र झाल्याने संबंधित दोन प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

​ही दोन्ही प्रकरणे दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यावेळी पॅनल प्रमुख एल. एस. पाढेन व जे. डी. उपरकर, तसेच अर्जदारांच्या विधीज्ञ वकील आशा गोंधळे आणि सामनेवाल्यांच्या विधीज्ञ वकील सुजाता पंडित यांनी दोन्ही पक्षकारांचे योग्य समुपदेशन केले.

​समुपदेशनानंतर दोन्ही पक्षकारांनी आपल्या दोन मुलींच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करून परस्पर समझोता करण्यास सहमती दर्शविली. परिणामी, चार वर्षांपासून दुरावलेले पती-पत्नी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले असून, आज ते आपल्या मुलींसह एकत्र राहण्यास गेले आहेत.

​राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून कौटुंबिक वाद सौहार्दपूर्णरीत्या निकाली काढण्याचा हा उपक्रम समाजात सलोखा व कौटुंबिक एकोपा वाढविण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!