नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जावी —
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट
नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुणे मूळ मार्गाचा धरला आग्रह
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे साठी संगमनेर अकोलेसह नारायणगाव राजगुरुनगर चाकण सिन्नर या ठिकाणाहूनही जनआंदोलन सुरू झाले आहे. ही रेल्वे मूळ मार्गानेच जावी यासाठी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आणि संपूर्ण जनभावना त्यांच्या कानावर घातली. तसेच मूळ मार्गासाठी आग्रह धरत त्यांना निवेदनही दिले.

यासंदर्भात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की,
नाशिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही मूळ निश्चित झालेल्या मार्गानेच; नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण मार्गे पुणे व्हावी, यासाठी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
हा मूळ मार्ग भौगोलिक व तांत्रिकदृष्ट्या अत्यंत योग्य असून संपूर्ण परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे. या मार्गावरील अडचणी लक्षात घेऊन २०२० मध्ये सुधारित डीपीआरही मंजूर करण्यात आला होता. रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा या प्रकल्पाला मंजुरी दिली. मी महसूल मंत्री असताना या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

म्हणूनच आता नव्याने उपस्थित होत असलेल्या अडचणी दूर करून नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ही मूळ मार्गानेच जावी, अशी ठाम भूमिका मी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडली. तसेच या मार्गावरील नागरिकांच्या भावना आणि अपेक्षाही त्यांच्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचवल्या.
हा मार्ग आत्ताच रेल्वेने जोडला जाऊ शकतो अन्यथा पुढची अनेक दशके आपल्याला वाट बघावी लागेल. त्यामुळे या लढाईत सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
