‘त्या’ बिबट्याला जेरबंद करण्याचे अथवा ठार मारण्याचे आदेश !
मयत बालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसह शासकीय नोकरी द्या — आमदार खताळ यांची विधानसभेत मागणी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
जवळे कडलग येथील बालकावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेत नागपूरच्या प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाने बिबट्याला जेर बंद करण्याचे किंवा ठार मारण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी वनमंत्र्यांची भेट घेवून यासाठी केलेल्या पाठपुराव्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नासिक येथील मुख्य वन संरक्षकाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टिम कार्यरत करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री जवळेकडलग येथील सिध्देश कडलग या चार वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत त्याला प्राण गमवावे लागल्याने ग्रामस्थांकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या. बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाल्याशिवाय सिध्देशचा मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती.
घटना घडल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांनी तातडीने वन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना देवून कडलग कुंटूबियांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे तसेच या भागातील बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी अधिक यंत्रणा सक्रीया करण्याच्या सूचना दिल्या.

वन मंत्री गणेश नाईक यांची भेट घेवून जवळे कडलग येथील घटने बरोबरच अहील्यानगर जिल्ह्यातील बिबट्यांच्या दहशतीचे वास्तव निदर्शानास आणून दिले. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी यांनी तातडीने नागपूर येथील प्रधान वन संरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी यांनाही संपर्क करून जवळेकडलग येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व उपाय करतानाच बिबट्याला ठार करण्याच्या दृष्टीने स्थानिक वन अधिकार्यंना परवानगी देण्याबबातचे आदेश निर्गमित करण्यास सांगितले.

मुख्य प्रधान वन संरक्षक एम.श्रीनिवास रेड्डी यांनी नासिकच्या मुख्य वन संरक्षकांना आदेश काढून जवळेकडलग येथे मानवी जिवीतास त्रासदायक ठरणार्या बिबट्यास जेरबंद करण्यासाठी भारत सरकाच्या सर्व नियमांना आधिन राहून सर्व उपाय करण्याचे तसेच हे प्रयत्न विफल झाल्यास बिबट्यास ठार करण्यास मंजूरी देत असल्याचे लेखी आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे नासिकच्या मुख्य वन संरक्षकाच्या अधिपत्याखाली तज्ञाची विशेष टिम पाचारण करण्याचे आदेशही नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षक कार्यालयाने निर्गमित केले आहेत.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सिद्धेश कडलग या बालकाच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समावेश होण्याबाबत विचार व्हावा. मयत बालकाचे आधार कार्ड नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्य मातून नागपूर विधिमंडळात मांडून सरकारचे लक्ष वेधले.
