जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्याने चिमुकल्याचा करुण अंत !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर तालुक्याला बिबट्याच्या वाढत्या दहशतीने ग्रासले असतानाच, जवळे कडलग गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात खेळत असलेल्या अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश सुरज कडलग या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा करुण अंत झाला. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या भीषण घटनेमुळे संपूर्ण तालुका हळहळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास सिद्धेश हा आपल्या घराच्या अंगणात खेळत होता, तर त्याचे आजी-आजोबा आणि कुटुंबीय शेतीत व्यस्त होते. याच वेळी गवतात लपून बसलेल्या एका बिबट्याने संधी साधून सिद्धेशवर झेप घेतली. आजीच्या डोळ्यांदेखत बिबट्याने या निष्पाप बाळाच्या मानेला धरून त्याला शेतात ओढत नेले.

आजीने केलेला आर्त किंकाळ्यांचा आवाज ऐकून घरातील आणि परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेतली. त्यामुळे बिबट्या घाबरला आणि सिद्धेशला सोडून पळून गेला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सिद्धेशला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेमुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात बिबट्याची दहशत अधिक वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निष्पाप सिद्धेशचा अकाली मृत्यू हा वनविभागासाठी एक मोठा इशारा असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. ४ वर्षांच्या चिमुकल्या सिद्धेशला श्रद्धांजली वाहताना, या हल्ल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर जवळे कडलग गावातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण बनले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. संतप्त ग्रामस्थांनी ‘जोपर्यंत बिबट्याला पकडले जात नाही किंवा ठार केले जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,’ अशी आक्रमक भूमिका घेतली.
वनक्षेत्रपाल सागर सांगळे आणि वनविभाग पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावण्याचे आणि पथक तैनात करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांचे वनविभागाविरुद्ध आंदोलन सुरू होते. जमावाच्या वाढत्या संतापामुळे आणि तणावामुळे पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.

वनक्षेत्रपाल सागर केदार यांनी सांगितले, जवळे कडलग येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पथक तैनात असून पिंजरा लावण्यात आला आहे. वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करत आहे.
