बिबट्यामुक्त तालुक्यासाठी सोमवारी जन आक्रोश आंदोलन !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून तालुक्यामध्ये बिबट्यांची खूप मोठी संख्या झाली आहे. यामध्ये अनेक नरभक्षक बिबटे असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा याकरता सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वा. संगमनेर बस स्थानक ते प्रांत कार्यालय येथे भव्य जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांनी दिली आहे.
‘बिबट्यामुक्त संगमनेर तालुका’ यासाठी सरकार व वन विभागाच्या विरोधातही भव्य जन आक्रोश संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे शेतकरी नागरिक लहान मुले यांच्यामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. जवळेकडलग येथील लहानग्या सिद्धेश ला आपला जीव गमावा लागला. याचबरोबर अनेक नागरिकांवर सातत्याने नरभक्षक बिबट्यांनी हल्ले केले आहेत. वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने संगमनेर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानक ते प्रांत कार्यालय या ठिकाणी भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे असे डॉ. थोरात यांनी सांगितले आहे.

तरी या जन आक्रोश मोर्चामध्ये सर्व नागरिक, महिला, युवक, शेतकरी या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बिबट्या हटाव आंदोलन समितीने केले असून बिबट्यांच्या वाढत्या दहशतीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निर्णायक ठाम लढ्यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ.जयश्री थोरात व जन आक्रोश आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
