रिकव्हरी चोरी विरोधात साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार — किसान सभा

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

उसाला रास्त पहिली उचल मिळावी या मागणीसाठी किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने सुरू आहेत. युवा शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या मंच व संघटनांच्या माध्यमातून आंदोलनात सक्रिय झाले आहेत. आंदोलनामुळे अनेक कारखान्यांना 500 ते 600 रुपये वाढ करून उचलीचे करार शेतकऱ्यांबरोबर करावे लागले आहेत. मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये अनेक कारखान्यांनी आपली रिकव्हरीची आकडेवारी कमी कमी करत नेली असल्याचे निदर्शनास येत आहे.

एफआरपी नुसार कमी पेमेंट द्यावे लागावे यासाठी ही रिकव्हरी चोरी केली जात आहे. काही कारखान्यांचे इथेनॉल प्रकल्प आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये साखरेचे प्रमाण ठेवावे लागते, त्याद्वारे सुद्धा रिकव्हरी कमी होते. त्याचा परिणाम म्हणून त्या कारखान्याची एफआरपी कमी निघते. इथेनॉल व उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्याला वाटा देण्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंगचा फॉर्मुला आहे. मात्र चलाखी करून कारखाने खर्च व उत्पन्न समान दाखवून शेतकऱ्यांना रेव्हेन्यू शेअरिंग करणे टाळतात. शेतकऱ्यांची ही लूट आहे.

रिकव्हरी बरोबरच वजनाची सुद्धा अनेक ठिकाणी चोरी केली जाते. कमी वजन दाखवून शेतकऱ्यांना लुटले जाते. रिकव्हरी व वजनाबाबत पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मात्र अशी पारदर्शकता ठेवली जात नाही व शेतकऱ्यांची लूट केली जाते. कारखानदारांच्या या लुटीचा पडदा पाडण्यासाठी युवा शेतकऱ्यांनी समोर येण्याची आवश्यकता आहे. किसान सभा व ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार आहे. कारखानदाराने रिकव्हरी व वजन चोरी मधील लुटमार थांबवावी अन्यथा अशा कारखान्यांच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान सभेचे डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावित, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख आदींनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!