पुणे – नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे !
आमदार अमोल खताळ हातात फलक घेऊन पोहोचले थेट विधानभवनात
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
पुणे–नाशिक रेल्वे संगमनेर मार्गेच गेली पाहिजे या संगमनेरकरांच्या एकमुखी मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी मागणीचे घोषवाक्य लिहिलेला टी-शर्ट परिधान करत हातात फलक घेऊन थेट नागपूरच्या विधान भवनात लक्षवेधी आंदोलन केले.

नारायणगाव जवळील जीएमआरडी (दुर्बीण) च्या अडथळ्याचे कारण देत पुणे नाशिक रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे करण्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी लोक सभेत सांगितले. त्यामुळे संगमनेरकर चांगलेच संतप्त झाले. हा रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच झाला पाहिजे यासाठी आमदार अमोल खताळ जनआंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे. मला संगमनेरचा जनतेने विधिमंडळात पाठवले आहे. त्यामुळे आपण सुद्धा या मागणीसाठी जनतेच्याबरोबर आहे. यासाठी आपण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठविणार असल्याचे जाहीर केले होते.

नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार अमोल खताळ यांनी पुणे नाशिक रेल्वेमार्ग संगमनेर मार्गे झाला पाहिजे या प्रमुख मागणीचे बोर्ड हातात घेऊन विधान भवनात प्रवेश केला आणि संगमनेर कर जनतेची भावना शासनापर्यंत पोहोचवली.
