गणपती बाप्पा बाप्पा पाण्यावर तरंगतायेत, पाहायला गेले आणि तिघे बुडाले !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
गणपती बाप्पा पाण्यावर तरंगतोय हे पाहण्यासाठी गेलेल्या तिघांचा एकापाठोपाठ एक पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील बामणी या गावाजवळील एका पाझर तलावात तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

देवानंद पिराजी गायकवाड (वय १५), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२) व वैभव पंढरी दुधारे (१५) (सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत. यात दोन सख्या भावांचा समावेश आहे.

बिलोली तालुक्यातील बामणी गावातील तलावात गणरायाच्या मुर्तीचे विसर्जन करण्यात आले होते. काही मुर्ती पाण्यावर तरंगत असल्याची माहिती या शाळकरी विद्यार्थ्यांना मिळाली. त्यानंतर देवानंद गायकवाड, बालाजी गायकवाड, वैभव दुधारे यांच्यासह अन्य एक असे चार जण तलावाकडे गेले होते. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही. तिघे जण नदीत उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने देवानंद गायकवाड, बालाजी गायकवाड, वैभव दुधारे हे एकापाठोपाठ बुडाले.

ही घटना गावात कळताच एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेऊन मृतदेह शोधाशोध करुन बाहेर काढले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, उपनिरीक्षक बालाजी गोणारकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. देवानंद आणि बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत, तर वैभव हा आई वडिलांना एकुलता एक होता. या दुर्देवी आणि मन पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने गायकवाड आणि दुधारे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (सौजन्य मटा)

