संगमनेर तालुक्यातील साकुर येथे मारुती कार मध्ये तरुणाचा मृतदेह आढळला !
अपघात की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकुर गावच्या शिवारात मंगळवारी रात्री एका मारुती वॅगनॉर कार मध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून हा अपघात आहे की घातपात ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

मयताचे नाव मनोज गोविंद वाळुंज (वय 32 वर्षे, राहणार पळशी तालुका पारनेर) असे आहे.
मंगळवारी रात्री मारुती वॅगनॉर कार क्रमांक एम एच 15 बी एक्स 3479 ही कार साकुर गावच्या शिवारात मांडवे कडून साकुर चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पेंडभाजे वस्तीच्या जवळ रस्त्याच्या कडेला रात्री ११ वाजता बेवारस आढळून आली. यामध्ये एक निपचित पडलेला तरुण आढळून आला. पोलिसांनी सदर इसमाला उपचारासाठी संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच तो मयत झाल्या असल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

घारगाव पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अद्याप पर्यंत पोस्टमार्टम करण्यात आलेले नसून पोस्टमार्टम चा अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशाने झाला आहे हे समजणार आहे. तसेच या गाडीचा अपघात झाला होता की आणखी काही संशयास्पद बाबी आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार आर. व्ही. भुतांबरे हे करीत आहेत.
