नाफेड कांदा खरेदी प्रक्रियेतील भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे — माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात
नाशिक मध्ये भर पावसात शेतकऱ्यांसाठी आंदोलन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नाशिक जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. येथे झालेले सर्व शेतकरी आंदोलने हे देशात पोहोचले आहे. नाफेड मध्ये कांदा खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून कांद्याला कमीत कमी 3 हजार रुपये हमीभाव मिळालाच पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

नाशिक येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने नाफेड भवनावर भर पावसामध्ये भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदार डॉ शोभाताई बच्छाव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख विश्वास उठगे, प्रदेश काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे, शरद आहेर, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, मोहन तिवारी, रमेश कहांडूळे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, निर्मलाताई खरडे, आदिवासी विभागाचे लकी जाधव, शहराध्यक्ष स्वाती जाधव, युवा काँग्रेसचे स्वप्निल पाटील, संतोष ठाकूर, किसान सेलचे संतू पाटील जायभाये, अल्तमस शेख, गौरव पानगव्हाणे, गौरव सोनार, तन्वीर तांबोळी आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

भर पावसामध्ये माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी धडक मोर्चा काढला. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
थोरात म्हणाले की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून देणारा हा नाशिक जिल्हा आहे. क्रांतीकारकांचा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन राज्यात नव्हे तर देशात पोहोचले आहे. नाफेड मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे .कोणाच्या आशीर्वादाने हा भ्रष्टाचार चालतो आहे याची चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांचा कांदा उत्पादन हे एनसीसीएफ मार्फत खरेदी झाली पाहिजे. मात्र तसे होत नाही. या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थापन केलेल्या संस्था आता त्यांच्या राहिल्या नसून व्यापारी व भांडवलदारांनी घेतल्या आहेत. या संस्थांमध्ये राजकीय पुढारी, मोठे अधिकारी, व्यापारी, धन दांडगे लोक आले आहेत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात या बोगस संस्था आल्या कशा, यांना परवानगी दिल्या कोणी याची चौकशी झाली पाहिजे. 20 तारखेला चांदवड येथे भव्य आंदोलन होणार असून सर्व शेतकरी व शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या पक्षांनी यामध्ये सहभागी व्हावे.
भर पावसात आंदोलन सुरू होते. यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणांनी परिसर दुमदुमून गेला या शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
