आईसमोरच चिमुरडीला बिबट्याने उचलून नेले
संगमनेर तालुक्यातील घटना
पिंजरे लावण्यात आले ; काळजी घेण्याचे वन विभागाचे आवाहन
प्रतिनिधी —
आपल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बांधावर बसवून जनावरांच्या चाऱ्यासाठी शेतात घास कापत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या चिमुकलीला अचानकपणे मानेला धरून उचलून नेले. ही घटना आई देखत घडली. आरडाओरडा केल्यानंतर गिन्नी गवतात लपून बसलेल्या बिबट्याने चिमुकलेला टाकून येथून पळ काढला. दवाखान्यात नेल्यावर ती चिमुकली मयत झाली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

ओवी सचिन गडाख (रा.हिवरगाव पावसा, ता. संगमनेर) असे मयत चिमुकलीचे नाव असून ही घटना आज (बुधवारी) सायंकाळी घडली.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा गावात रोडच्या कडेला गडाख वस्ती आहे. मयत ओवीचे आई वडील हे शेती सोबत दुध व्यवसाय करतात. त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. दररोजप्रमाणे आज देखील काम सुरू होते. दुपारी गायांचे काम आवरून त्यांना चारा काढण्यासाठी मयत ओवीची आई सायंकाळी मुलीला घेऊन घास कापण्यासाठी आली. ओवीला शेताच्या बांधावर ठेवले. मात्र, तेथे बिबट्यांचा वावर जास्त असतो हे कदाचित आईच्या लक्षात आले नसावे. मयत ओवी ही बांधावर खेळत होती. आई गायांसाठी घास कापत होती. रस्त्याच्या कडेला लोक येत जात होते. बिबट्याचा डोळा मात्र लहान चिमुरडीवर होता. त्याने या चिमुरडीला एकटीच असल्याचे पाहिले आणि आपला डाव साधला. बिबट्याने चिमुरडीवर हल्ला करत तिला तोंडात धरून उचलुन बाजूलाच असलेल्या दाट गिन्नी गवतात नेले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील येणाऱ्या शिक्षकांनी पाहिला.

दरम्यान मुलीच्या आईने आरडा ओरडा सुरू केला. तेथे एकच गर्दी जमली. लोकांनी गवताकडे धाव घेतली असता बिबट्याने चिमुरडीला सोडले. त्यानंतर तात्काळ दिड वर्षांच्या चिमुरडीला उपचारासाठी रुग्णलयात दाखल केले. पण चिमुकलीने आपला जीव गमावला होता. तिला रुग्णलयात डॉक्टरांनी मयत घोषीत केले.
झोळे व हिवरगाव पावसा येथे बिबट्यांचा वाढता वावर पाहता येथील ग्रामपंचायतीने वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी केली होती. परंतु आमच्याकडे पिंजरा शिल्लक नाही असे तोंडी सांगण्यात आले. हिवरगाव पावसा येथे वनाधिकारी यांनी वेळेत पिंजरा लावला असता तर सचिन शांताराम गडाख यांच्या मुलीचा जीव गेला नसता. त्यामुळे, वनाधिकाऱ्यांवर गावकऱ्यांनी तीव्र नाराज व्यक्त केली आहे.

दरम्यान वन संरक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आणि रेस्क्यू टीम सह घटनास्थळी ताबडतोब धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. या भागात बिबट्यांचा सतत वावर असून रात्रीच्या वेळी आणि शेतात काम करताना काळजी घ्यावी असे आवाहनही पाटील यांनी केले असून मयत मुलीच्या कुटुंबियांना शासकीय नियमाप्रमाणे मदत देण्यात येईल तसेच या परिसरात वनविभागाच्या वतीने लगेच पिंजरे लावण्यात आले असल्याचे देखील पाटील यांनी सांगितले. यावेळी सचिन लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन परिमंडळ अधिकारी ताजने, वनरक्षक बोराडे आणि संगमनेर वनविभाग (भाग एकचे) रेस्क्यू टीमचे कर्मचारी देखील उपस्थित होते.
