अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला – आमदार खताळ

संगमनेर / प्रतिनिधी 

माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला घडवणारे मार्गदर्शक नेते अजितदादा पवार आपल्यात नाहीत, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून महाराष्ट्र पोरका झाला आहे, अशा शब्दांत संगमनेर तालुक्याचे शिवसेना महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आमदार खताळ म्हणाले, चांदा ते बांद्यापर्यंत अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना विविध पदांवर काम करण्याची संधी देऊन त्यांना नेते केले अशा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा बारामती येथे विमान लँडिंगदरम्यान अपघात झाला, त्यामध्ये त्यांचे निधन झाले ही बातमी अत्यंत धक्कादायक आहे. ते आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात काळा दिवस म्हणून नोंदला जाईल. मी स्वतः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये कार्यरत होतो तेव्हा त्यांच्याशी माझा जवळून संपर्क आला. त्यांचा जनता दरबार मी प्रत्यक्ष पाहिला आहे. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती. 

कार्यकर्त्यांकडून काम करून घेण्याची त्यांची वेगळी पद्धत होती. संगमनेर तालुक्याचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार झाला, हे ऐकून त्यांना मनापासून आनंद झाला होता. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मी नेहमी त्यांचे मार्गदर्शन घेत होतो. अशा या माझ्या मार्गदर्शक नेत्याला मी जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!