नाशिक-पुणे महामार्गावर बोटा शिवारात कारला अपघात, पती-पत्नीचा मृत्यू; महिला गंभीर जखमी
संगमनेर दि. 28 प्रतिनिधी —
नासिक पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारला संगमनेर तालुक्यात बोटा गावाजवळ असलेल्या माळवाडी शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील रहिवासी असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला असून अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सचिन वसंतराव दरेकर (वय ५७), रमा सचिन दरेकर (वय ५३) अशी अपघातात मृत झालेल्या पती-पत्नीच नाव आहे. तर सीमा देशमुख नावाची महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातातून आणखी एक जण बचावला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पुणे शहरातील गुरुवार पेठेतील दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर, रमा सचिन दरेकर, सीमा सुरेंद्र देशमुख व सुरेंद्र देशमुख असे चौघे प्रजासत्ताक दिनी पहाटे साडेपाच वाजता कारमधून नाशिकला लग्नासाठी चालले होते.

दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारात आले असता त्यांच्या कारला अपघात झाला. एका नादुरुस्त वाहनावर कार धडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अपघातातील जखमींना त्यानंतर उपचारांसाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलविले होते. मात्र, सचिन दरेकर व रमा दरेकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर गंभीर जखमी सीमा देशमुख यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरेंद्र देशमुख अपघातातून बचावले आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, सुभाष बोडखे, साईनाथ दिवटे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. याप्रकरणी मयत सचिन दरेकर यांचे भाऊ सतीष वसंतराव दरेकर यांनी दिलेल्या खबरीवरुन घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे हे करत आहे.
