‘निष्ठावंतांचा’ एल्गार !

बाळासाहेब थोरातांभोवतीच्या ‘चमचेगिरी’विरोधात कार्यकर्ते आक्रमक ; आज संगमनेर कारखान्यावर थेट संवाद !

संगमनेर प्रतिनिधी –

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक आणि मोठी बातमी समोर येत आहे. थोरातांच्या अवतीभवती असणारे ‘घोषमस्करे’ आणि ‘चमच्यांमुळे’ वर्षानुवर्षे पक्षासाठी रक्त-घाम गाळणारा निष्ठावान कार्यकर्ता नेहमीच बाजूला फेकला गेल्याची खदखद आता उफाळून आली आहे. या चमचेगिरीचे थेट चटके निवडणुकांमध्ये बसल्यानंतर, आता अखेर संगमनेरमधील निष्ठावान कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी थेट बाळासाहेब थोरातांसोबत थेट संवाद करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आज, रविवार दिनांक १९ जुलै रोजी दुपारी ठीक ४:०० वाजता, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर या ‘निष्ठावंतांचा मेळावा’ आणि थेट संवाद बैठक पार पडणार आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील पोस्ट तुफान व्हायरल झाल्या असून, या बातमीने संगमनेरच्या आणि अहमदनगरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीची भावना होती. “नेते आमचे, पण फायदा दुसऱ्यांचाच,” अशी अवस्था निर्माण झाली होती. थोरातांच्या अवतीभवती घोळका करून राहणाऱ्या काही स्वार्थी घटकांमुळे खऱ्या कार्यकर्त्याला डावलले जात होते, अशी उघड खंत निष्ठावंत बोलून दाखवत होते. अखेर हा अन्याय सहन न करता, या चमच्यांना बाजूला सारून थेट नेत्यांशीच ‘समोरासमोर’ चर्चा करण्याचा धाडसी निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

नेत्यांच्या अवतीभवती असणारा ‘घोषमस्कऱ्यांचा’ गराडा मोडून काढणे, मध्यस्थांशिवाय थेट बाळासाहेब थोरात यांच्याकडे कार्यकर्त्यांच्या भावना आणि तक्रारी मांडणे, या चमचेगिरीमुळे निवडणुकांमध्ये जे नुकसान झाले, त्यावर थेट बोट ठेवणे, ज्यांनी पक्षाला कठीण काळात साथ दिली, त्यांना न्याय मिळवून देणे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

बैठकीचा संदेश देणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने गेल्या काही तासांत माजी मंत्री थोरात यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा गराडा वाढताना दिसत आहे. प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता आहे – आजच्या बैठकीत काय होणार ?

आज दुपारी ४ वाजता होणाऱ्या या बैठकीत निष्ठावान कार्यकर्ते नेमकी कोणाबाबत नाराजी व्यक्त करणार ? कोणाकोणाचे मुखवटे गळून पडणार ? आणि मुख्य म्हणजे, आपले खंदे समर्थक आक्रमक पवित्र्यात समोर आल्यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावर काय भूमिका घेणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

एवढे मात्र नक्की की, या मेळाव्यानंतर संगमनेरच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी मिळणार असून, ‘चमचेगिरी’ करणाऱ्यांची चिंता वाढली आहे !

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!