हत्या आणि गंभीर घटना घडल्यानंतरच पोलीस व एलसीबी जागी होते का ?

श्रीरामपूर घटनेनंतर सलग कारवाया ; आता अचानक गुन्हेगार सापडण्याचा धडाका कसा ?

संगमनेर टाइम्स | विशेष प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात एखादी हत्या किंवा गंभीर गुन्हा घडल्यानंतरच पोलीस यंत्रणा आणि विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अधिक सक्रिय होते का, असा प्रश्न आता नागरिकांमधून जोर धरू लागला आहे. श्रीरामपूर येथे झालेल्या हत्येनंतर निर्माण झालेल्या तीव्र जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर एलसीबीने अवैध धंदे, अमली पदार्थांची तस्करी आणि विविध गुन्हेगारीविरोधात धडक कारवायांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे “हे अवैध धंदे यापूर्वी कुठे होते?” आणि “आता अचानक गुन्हेगार इतक्या मोठ्या प्रमाणात कसे सापडू लागले?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

श्रीरामपूरमधील हत्येनंतर शहरात संतापाची लाट उसळली. शहर बंद ठेवण्यात आले, नागरिक रस्त्यावर उतरले आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी कठोर भूमिका घेत विविध पथकांना विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश दिले. त्यानंतर एलसीबीकडून सलग धाडी टाकण्यात येत असून, अमली पदार्थ, अवैध दारू व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कारवाईचा वेग वाढला आहे.

नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की, जर हे अवैध धंदे आणि गुन्हेगारी आधीपासूनच सुरू होती, तर ती एलसीबीच्या निदर्शनास का आली नाही? माहिती असूनही कारवाई का झाली नाही? आणि आता अचानक आरोपी व गुन्हेगार शोधून काढण्याचा धडाका कसा सुरू झाला? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडून अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कार्य म्हणजे संघटित गुन्हेगारीवर सतत लक्ष ठेवणे, गुप्त माहिती गोळा करणे, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे आणि अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त करणे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे बेकायदेशीर व्यवसाय सुरू राहतात आणि एखादी गंभीर घटना घडल्यानंतरच कारवायांचा वेग वाढतो, अशी भावना जिल्ह्यातील अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

संगमनेरमधील गंभीर गुन्ह्यांचे काय झाले ?

संगमनेर शहर आणि तालुका अमली पदार्थांच्या तस्करीसाठी संवेदनशील मानला जातो. गेल्या दोन वर्षांत लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त झाले आणि अनेक गुन्हे दाखल झाले. मात्र या प्रकरणांतील मुख्य सूत्रधारांपर्यंत तपास पोहोचला का, दोषींना शिक्षा झाली का, याबाबत ठोस माहिती क्वचितच समोर येते. तेच तेच आरोपी पुन्हा तोच अमली पदार्थ तस्करीचा धंदा करताना देखील आढळून आले आहेत, हे कसे काय होते असाही सवाल उपस्थित होतो.

दरम्यान, संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याला चार महिने उलटत आले तरी आरोपींचा ठोस मागमूस लागलेला नाही. त्यानंतर मालुंजे येथे गोळीबार व तलवारीने हल्ला झाल्याच्या गंभीर प्रकरणातील आरोपीही अद्याप फरार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे तपासाच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

कायद्याची अंमलबजावणी केवळ गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करण्यापुरती मर्यादित नसून, गुन्हे घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सातत्याने गुप्त माहितीच्या आधारे कारवाया झाल्या असत्या, तर अनेक गंभीर गुन्हे रोखता आले असते, असे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

जिल्हाभरात सातत्यपूर्ण कारवायांची अपेक्षा

फक्त श्रीरामपूरच नव्हे, तर संगमनेरसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू, अमली पदार्थांची तस्करी, मटका, जुगार अड्डे आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कायमस्वरूपी आळा घालण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. गंभीर गुन्हे करून सहजरीत्या पळून जाणारे आरोपी आणि तेच तेच गुन्हे पुन्हा करून सहजासहजी जामीन मिळवून समाजात दहशत निर्माण करणारे गुन्हेगार हे कायमचे नेस्तनाबूत करण्याची गरज व्यक्त होत आहे. त्यासाठी एखाद्या मोठ्या घटनेची वाट न पाहता एलसीबीने नियमित गुप्त माहितीच्या आधारे सातत्यपूर्ण कारवाया कराव्यात, अशी अपेक्षा आहे.

गुन्हा घडल्यानंतर आरोपींना अटक करणे ही पोलीस यंत्रणेची जबाबदारी असली, तरी गुन्हेगारीची मुळे वेळेत उपटून टाकणे आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हेच प्रभावी पोलिसिंगचे खरे लक्षण मानले जाते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यपद्धतीचे वरिष्ठ स्तरावर वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून जिल्हाभरात अधिक सातत्यपूर्ण, प्रभावी आणि परिणामकारक कारवाईची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!