जुलै ऑफ काइंडनेसमधून देवकौठ्याच्या चिमुकल्यांची पाखरांना प्रेमाची साद
“या पाखरांनो, परत फिरा रे…”
संगमनेर | प्रतिनिधी –
समाजात सकारात्मकता, संवेदनशीलता आणि निसर्गाविषयीची आत्मीयता वाढावी या उद्देशाने डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या “मंथ ऑफ काइंडनेस” उपक्रमांतर्गत देवकौठे येथील रमाजी गेनुजी पाटील कहांडळ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पक्ष्यांसाठी धान्य टाकत “या पाखरांनो, परत फिरा रे…” अशी हृदयस्पर्शी साद घातली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाने पर्यावरण संवर्धनाचा आणि दयाळूपणाचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचवला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळील परिसरात, अंगणात तसेच शाळेच्या प्रांगणात चिमण्या व इतर पक्ष्यांसाठी दाणे टाकून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला. निसर्गाशी मैत्री जोडणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि आनंद पाहण्यासारखा होता.

यावेळी संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक संजय लहारे, शिक्षक शरद शेवंते, ज्ञानदेव गाडेकर, रंगनाथ वारुंगसे, आशा सूर्यवंशी, सुशीलकुमार गायकवाड, अब्दुल गनी पठाण, राजेंद्र चत्तर, संदीप सोनवणे, मंगेश देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. थोरात यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “मंथ ऑफ काइंडनेस” उपक्रमाचा उद्देश समाजातील कटुता कमी करून सहिष्णुता, आदरभाव, आपुलकी आणि माणुसकीची भावना वृद्धिंगत करणे हा आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांशी संवाद साधणे, आई-वडिलांना शेतीकामात मदत करणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सहभागी होणे अशा अनेक कृतींमधून दयाळूपणाचा संदेश दिला.

विद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन झाडांच्या परिसरात पक्ष्यांसाठी धान्य टाकले. “या चिमण्यांनो, परत फिरा रे…” असा सामूहिक स्वर देत त्यांनी निसर्गगीत, बालगीते आणि बडबडगीते गात हा उपक्रम आनंदोत्सवात रूपांतरित केला.
यावेळी बोलताना मुख्याध्यापक संजय लहारे म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात चिमण्या, कावळे आणि विविध पक्ष्यांचा मुक्त वावर दिसत असे. मात्र ग्लोबल वॉर्मिंग, पाण्याची टंचाई, रासायनिक खतांचा वाढता वापर आणि बदलती जीवनशैली यामुळे पक्ष्यांची संख्या चिंताजनकरीत्या घटत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी आणि प्राण्यांचे अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रेम, जिव्हाळा आणि संवेदनशीलता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कहांडळ विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पर्यावरण संवर्धन, सामाजिक जाणीव आणि मूल्यशिक्षण यांचा संगम घडविणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये देवकवठे तसेच सिन्नर तालुक्यातील मलढोण गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमाचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष भारत मुंगसे, उपाध्यक्ष भागवतराव आरोटे, संचालक एकनाथ मुंगसे, इंजि. सुभाषराव सांगळे, राजेंद्र कहांडळ, राजेंद्र मुंगसे, सतीश आभाळे, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, राजाराम मुंगसे, गणेश सोनवणे, काशिनाथ त्रिंबक कहांडळ, सरपंच ज्योती मोकळ, चेअरमन तुकाराम कहांडळ, बाबासाहेब गाजरे, ज्ञानेश्वर मुंगसे, मलढोणचे सरपंच तानाजी बोंबले यांच्यासह विविध मान्यवरांनी कौतुक केले.

दयाळूपणा, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “चिमण्या परत आल्या तर निसर्गही पुन्हा हसेल” हा आशावाद या उपक्रमातून व्यक्त होत आहे.
