संगमनेर बाजार समितीच्या सभापतींवर गुन्हा दाखल !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बिरेवाडी ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये अचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल केलेल्या आरोपींमध्ये संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांचा समावेश आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिरेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक काही दिवसांपूर्वी संपन्न झाली आहे. मात्र निवडणूकी दरम्यान शंकर हनुमंता खेमनर व इंद्रजित अशोक खेमनर यांनी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे अचारसंहितेचा भंग केला आहे.

त्यामुळे या प्रकरणी संजय रामनाथ वाकचौरे (संगमनेर पंचायत समिती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २८१ / २०२२ भारतीय दंडसहिता कलम १७१ सी उपकलम १ व लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ १ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायळ हे करत आहेत.

