बालकाचे लैंगिक शोषण करणाऱ्या संगमनेरच्या व्यापाऱ्याला सश्रम करावासाची शिक्षा !
प्रतिनिधी —
स्टेशनरीच्या दुकानात पुस्तकांच्या चौकशीसाठी आलेल्या पंधरा वर्ष वयाच्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासोबत अश्लील कृत्य करणाऱ्या व्यावसायिक राजेश दिगंबर पाठक याला संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश योगेश पी. मनाठकर यांनी ३ वर्ष तुरुंगवास (सक्तमजुरी) आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकारामुळे संगमनेरच्या व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संबंधित विद्यार्थी दहावीचे पुस्तक आले आहे का, हे पाहण्यासाठी श्री स्टेशनरी या दुकानात गेला असता दुकान मालकाने दुकानात कोणी गिर्हाईक नसल्याचा गैरफायदा घेत या विद्यार्थ्यांशी अश्लील चाळे केले. त्यामुळे घाबरलेला हा विद्यार्थी तेथून दुकानाबाहेर पळाला. त्याने मित्र व आई वडिलांना याची माहिती दिल्यानंतर ते सर्वजण दुकानात आले आणि त्यांनी दुकानदारास जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाठक याने असला काही प्रकार झालाच नसल्याचा बनाव केला.

24 मे 2018 रोजी सदरची घटना घडली होती. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात पीडित बालकाने दिलेल्या तक्रारीवरून शहरातील श्री स्टेशनरी या दुकानाचे संचालक राजेश दिगंबर पाठक यांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करत संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपी पाठक याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी काम बघितले. आरोपी विरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले या सर्वांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.

आरोपी आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेत न्यायाधीश मनाठकर यांनी समोर आलेले पुरावे लक्षात घेत आरोपी राजेश दिगंबर पाठक याला तीन वर्षे सश्रम कारावासाची आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील गवते यांना या कामी पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत तोरवेकर, एकनाथ खाडे, प्रवीण डावरे, महिला पोलीस कर्मचारी सारिका डोंगरे, स्वाती नायकवाडी यांनी सहाय्य केले.
