नासिक – पुणे सेमी हायस्पीड रेल्वे…
मुख्यमंत्र्यांनी चर्चेचा प्रस्ताव स्वीकारला !
अकोले स्टेशनसह पूर्वीच्या मार्गाने जावी यासाठी सहविचार सभा संपन्न..
संवाद व संघर्ष दोन्ही मार्गाने प्रयत्न करण्यावर एकमत
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
नाशिक-पुणे रेल्वे अकोले स्टेशन सह पूर्वीच्याच मार्गाने गेली पाहिजे या मागणीसाठी या मार्गावरील सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते तसेच संबंधित तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या रेल्वे कृती समितीचे कार्यकर्ते यांची सहविचार सभा नांदूर खांदरमाळ फाटा संगमनेर येथे संपन्न झाली. अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांनी आपल्या या मागणीसाठी नुकताच अकोले ते संगमनेर भव्य मोर्चा काढला होता. 22 किलोमीटरचे अंतर पार करत संगमनेर प्रांत कार्यालयावर धडकलेल्या या मोर्चामध्ये संबंधित सर्व आमदार खासदारांनी एकत्र बैठक करून या आंदोलनाचे नेतृत्व करावे असे आवाहन अकोले करांनी केले होते. आमदार सत्यजित तांबे यांनी या आवाहनानुसार पुढाकार घेतला. डॉक्टर अजित नवले यांनीही सर्व आमदार खासदार व परिसरातील नेतृत्वांना संपर्क करून एकजूट करण्याचा प्रयत्न केला. अजय फटांगरे यांनी या कामी मेहनत घेतली.

संवाद व संघर्ष या दोन्ही मार्गाने प्रयत्न करून आपली मागणी मान्य करून घेण्यावर यावेळी सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांचे एकमत झाले.
आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सर्व प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडली जाणार असून यासाठी आजच्या बैठकीतूनच आ. सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री महोदयांसोबत फोनवरून चर्चा केली. त्यांनी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याबाबत आश्वस्त केले.

आ. सत्यजित तांबे, डॉ. अमोल कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील, मा.खा. सदाशिवराव लोखंडे, आ. शरद सोनवणे, आ. किरण लहामटे, आ. बाबाजी काळे, आ. अतुल बेनके, देवदत्त निकम, सत्यशील शेरकर, नीलम अमोल खताळ, उत्कर्षा रूपवते, उदय सांगळे, कॉ. अजित नवले, कॉ. कारभारी उगले, बाजीराव दराडे, महेश नवले, गणेश ताजने, मच्छिंद्र धुमाळ, प्रदीप हासे, डॉ. संदीप कडलग, विनय सावंत, जालिंदर वाकचौरे, अमोल वाघमारे, प्रमोद मंडलिक, वसंत बाळसराफ, कपिल पवार, दत्ता ढगे, हरिभाऊ तांबे, यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांनी आपले अनुभव मांडत लढ्याची पुढील दिशा कशी असावी याबाबत मार्गदर्शन केले.

संवादाने प्रश्न मिटेल अशी आशा यावेळी सर्व आमदार खासदार व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. मात्र तसे झाले नाही तर नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर या सर्व परिसरामध्ये व्यापक जनजागृती करून भव्य लढा उभारण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. सिन्नर ते राजगुरुनगर असा भव्य वेहिकल मार्च काढून आंदोलनाची तयारी करण्याबाबत यावेळी प्रस्ताव मांडण्यात आला. सरकारने जनभावना लक्षात न घेतल्यास चाकण किंवा आळेफाटा या ठिकाणी बेमुदत चक्काजाम आंदोलन करून हा प्रश्न केंद्रस्थानी आणण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
