अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोले मोर्चा व जोरदार निदर्शने

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क  —

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयावर आज दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी भव्य मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

अंगणवाडी कर्मचार्यांच्या केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन यांच्याकडे असलेल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली. एकात्मिक महिला व बालकल्याण विभाग अहमदनगर जिल्ह्यातील ICDS अकोले शहरी प्रकल्प तसेच अकोले व राजुर प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व अंगणवाडी कर्मचारी आज अंगणवाडी केंद्र बंद ठेऊन मोर्चात सामील झाले.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अंगणवाडी ताईना भरघोस मानधन वाढ जाहीर केली. प्रत्यक्षात मात्र अनेक अडचणी व अटी शर्ती लाऊन प्रोत्साहन भात्याच्या जाळ्यात अंगणवाडीताईना अडकवले व मोठी फसवणूक केली. तब्बल एक वर्षानंतर केवळ 4 ते 5 टक्के अंगणवाडी ताईनाच प्रोत्साहन भत्ता मिळाला. तोही खूपच अल्प प्रमाणात. आजच्या मोर्चात अंगणवाडी ताईनी सरकारची लबाडी ओळखून कोणतेही निकष न लावता सर्व सेविका व मदतनीसांना सरसकट 100% प्रोत्साहन भत्ता मानधनात रुपांतरीत करून द्यावा अशी प्रमुख मागणी केली.

या शिवाय थकीत इंधन खर्च, प्रवास खर्च, अमृत आहार खर्च व थकीत इतर देणे तातडीने अदा करा, जुन्या व जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या अनेक अंगणवाड्या धोकादायक झाल्या आहेत, त्यांची नव्याने उभारणी करा, नादुरुस्त अंगणवाडी केंद्र तातडीने दुरुस्त करा, कमी शिकलेल्या अंगणवाडी ताईना त्यांचे शिक्षण व शारीरिक व बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन कामाचा बोजा द्या, नवीन तंत्रज्ञान समजून घेणे व काम करणे शक्य नसलेल्या सेविकांना सोयीची पर्यायी व्यवस्था शासकीय खर्चाने उपलब्ध करून द्या, दिवाळीला दोन महिने होऊन गेलेत अद्याप सरकारकडून भाऊबीज जमा झाली नाही ती तातडीन द्या, अंगणवाडी कर्मचार्यांना निवडणुकीची व इतर कोणतीही योजना बाह्य कामे देऊ नका, यासह अनेक मागण्या प्रशासनाच्या माध्यमातून शासनाकडे भव्य मोर्चा जाऊन केल्या.

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ.डॉ. अजितजी नवले यांनी पक्ष कार्यालयात झालेल्या सभेत मोर्चातील सदस्यांना मार्गदर्शन केले. अकोल्यातील देवठाण स्टेशनसह पुणे नाशिक रेल्वे झाली पाहिजे या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या लढ्यात सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर अकोलेतून भव्य मोर्चा तहसील कचेरी येथे आल्यावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. त्यावेळी सी.आय.टी.यु. संघटनेचे अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते कॉ. गणेश ताजणे, संघटनेच्या राज्य सदस्या रंजना पराड व निर्मला मांगे, उपाध्यक्षा नंदा म्हसे, रोशनी शिंगोटे, सचिव आशा घोलप, माधुरी वाकचौरे, वंदना कराले, अक्काबाई देशमुख, मथुराबाई चौधरी, छाया मोरे, मंगल गोरे, इंदुमती चोखंडे, कल्पना पवार, द्रोपदा रावते, संगीता शेळके, प्रज्ञा भुसे, आशा औटी, श्रद्धा आंबरे, शशिकला धुमाळ, यांची भाषणे झाली.

अकोले तहसीलचे नायब तहसीलदार लोहारे साहेब यांच्या सह अकोले ICDS च्या प्रभारी प्रकल्प अधिकारी सौ. एखंडे मॅडम व राजुर ICDS च्या प्रभारी प्रकल्प अधिकारी श्रीमती गवारी मॅडम यांनी मोर्चाला सामोरे येऊन मागण्याचे निवेदन स्वीकारले व तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!