लिंग गुणोत्तर वाढीसाठी ‘जनजागृती’ वर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
‘लेक लाडकी’ अभियानासह शासनाच्या विविध उपक्रमांमुळे समाजात मुलींच्या जन्माचे स्वागत होत आहे. ही सकारात्मकता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी व जिल्ह्यातील लिंग गुणोत्तराचा समतोल राखण्यासाठी आरोग्य विभागाने गावनिहाय ‘सूक्ष्म नियोजन’ करावे, तसेच अवैध गर्भलिंग निदान रोखण्यासाठी गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायदा’ जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक तथा समिती सचिव डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. सतिष पाटील यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील लिंग गुणोत्तर अधिक सुधारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला त्रिसूत्री कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. यामध्ये कायद्याची प्रभावी प्रसिद्धी करून लोकसहभाग वाढवणे, आशा सेविका व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने माहिती संकलित करणे व उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करून त्यानुसार कृती आराखडा तयार करणे या बाबींचा समावेश आहे. ज्या गावांमध्ये लिंग गुणोत्तराचे प्रमाण सुधारण्यास वाव आहे, अशा गावांवर विशेष लक्ष केंद्रित करून तेथील सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी गरोदरपणात पहिल्या १२ आठवड्यांतच मातांची नोंदणी होणे अत्यंत आवश्यक आहे. महानगरपालिका व ग्रामीण आरोग्य यंत्रणेने या ‘लवकर नोंदणी’ (अर्ली रजिस्ट्रेशन) प्रक्रियेवर भर द्यावा, जेणेकरून गरोदर मातांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळतील आणि पीसीपीएनडीटी कायद्याचीही काटेकोर अंमलबजावणी होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

तसेच, जिल्ह्यात १०० टक्के जन्म नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने कटिबद्ध रहावे. प्रसूती खाजगी रुग्णालयात, शासकीय संस्थेत किंवा जिल्ह्याबाहेर झाली तरीही त्याची अचूक नोंद आपल्याकडे असायला हवी. या कामात आशा सेविकांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी जन्म नोंदणीच्या कामाशी त्यांचा प्रोत्साहन भत्ता जोडण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केली.
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी समितीच्या कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी आरोग्य, पोलीस, कायदा, न्याय, महिला व बालविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
