पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प २०१९ च्या प्रस्तावित मार्गानेच कार्यान्वित करावा
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लोकप्रतिनिधींची बैठक बोलावण्याची विनंती
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प २०१९ च्या मूळ प्रस्तावित आराखड्यानुसारच (संगमनेर-अकोले मार्गे) कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली असून, जनतेच्या भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याची विनंती केली आहे.

केंद्रीय रेल्वे विभागाने २०१९ मध्ये तयार केलेल्या प्रकल्प अहवालानुसार हा रेल्वे मार्ग नारायणगाव, संगमनेर, अकोले व सिन्नर असा प्रस्तावित होता. या नियोजनानुसार संबंधित भागातील जमिनींचे अधिग्रहण देखील करण्यात आले होते. मात्र, सध्या या प्रस्तावात बदल करून अकोले तालुक्याला वगळण्यात आल्याचे व हा मार्ग आता नारायणगाव-संगमनेर-नाशिक असा प्रस्तावित असल्याचे समोर आले आहे. या बदलामुळे स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रकल्पामध्ये बदल करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आले नसल्याची बाब विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

सद्यस्थितीत रेल्वे मार्गाच्या प्रकल्प अहवालातील बदलांमुळे लोकप्रतिनिधी व जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. प्रशासकीय स्तरावर याबाबत नेमकी कोणती कार्यवाही सुरू आहे, याची माहिती उपलब्ध होत नाही. तसेच, पुण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गात नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’ (GMRT) या रेडिओ टेलिस्कोप सेंटरची तांत्रिक अडचण असल्याचे कारण केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेतील निवेदनात स्पष्ट केले आहे.

ही सर्व परिस्थिती विचारात घेऊन, प्रकल्पाबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित सर्व लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी. तसेच, २०१९ च्या मूळ प्रकल्प अहवालाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी व जनतेच्या भावना केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, अशी आग्रही विनंती पालकमंत्री विखे पाटील यांनी केली आहे.
