निविदा विरोधात महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिकाचालक संघाचे काळ्या फिती लावून आंदोलन

राज्यातील चार विभागांतील ३० एकात्मिक आपत्कालीन आरोग्य सेवा विभागाच्या नव्या निविदा प्रक्रियेविरोधात निषेध

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिकाचालक संघाच्या वतीने राज्य सरकारच्या नव्या निविदा प्रक्रियेविरोधात शुक्रवारी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्यातील चार विभागांतील ३० एकात्मिक आपत्कालीन आरोग्य सेवा विभागातील रुग्णवाहिका चालक व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

संघाचे राज्याध्यक्ष आनंदराव शिंगणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या नव्या निविदेमुळे अनेक अनुभवी रुग्णवाहिका चालक व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येण्याची शक्यता आहे. अनेक कर्मचारी मागील १२ ते २० वर्षांपासून सेवा बजावत असून, त्यांच्या अनुभवाचा विचार न करता नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

तसेच रुग्णवाहिका सेवेमध्ये कार्यरत चालक, वैद्यकीय तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांच्या सेवासुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, शासनाने ही निविदा प्रक्रिया तातडीने स्थगित करून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

याच मागणीसाठी राज्यभर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले असून, आवश्यक असल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिकाचालक संघाने दिला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!